पैठण | किरण काळे पाटील: संत एकनाथ महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेची (Shikshak Patsanstha) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे आकडे आणि त्याचवेळी विरोधकांवर देण्यात आलेल्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे लक्षवेधी ठरली. या सभेत संस्थेला १.०७ कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर दुसरीकडे ४ कोटींच्या गंगाजळीवरून (राखीव निधी) सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा चेअरमन अमोल एरंडे यांनी दिला आहे.
आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन अमोल एरंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ करण्यात आली असून, एकूण कर्जमर्यादा २१.५ लाखांवरून २५.६० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, पतसंस्थेवरील जिल्हा बँकेचे १७ कोटींचे कर्ज आता ९ कोटींवर आले असून, एकूण कर्जवाटप ४० कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
४ कोटींच्या गंगाजळीवरून अफवा पसरवणाऱ्यांना कारवाईचा इशारा
या आमसभेत ४ कोटी रुपयांच्या राखीव निधीतून (गंगाजळी) स्थावर मालमत्ता खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. यावर व्यवस्थापनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. चेअरमन अमोल एरंडे यांनी आरोप केला आहे की, सलग २९ महिने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे संचालक पद गमवावे लागलेले काही पराभूत माजी संचालक पतसंस्थेची बदनामी करत आहेत. या निधीतून जमीन खरेदीचा ठराव दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात एकही पैसा अद्याप खर्च झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या हितास बाधा आणणाऱ्या आणि सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर पुरावे गोळा करून सहकार कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे एरंडे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, या वादावर पडदा टाकण्यासाठी, शहरात जागेची पाहणी करून ती सभासदांच्या पसंतीस उतरल्यासच विशेष सर्वसाधारण सभा बोलावून खरेदीचा अंतिम निर्णय घेण्याचे सभेत ठरले आहे.
या सभेत सभासदांसाठी ९ टक्के लाभांश (६+३) देण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही रक्कम २१ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार आहे. याशिवाय, तातडीची कर्जमर्यादा ६० हजार रुपये करण्यात आली असून, दरमहा शेअर्स वर्गणी १७०० वरून २००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आमदार विलासबापू भुमरे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम आणि मुख्यालयाच्या अटीतून वगळणे या प्रश्नांवर राज्यस्तरावर पाठपुरावा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. पतसंस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्यासही मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभेचे सूत्रसंचालन श्रीकांत कराड आणि संजय सुपेकर यांनी केले, तर सचिव अमोल शेळके यांनी आभार मानले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंवर रील बनवणाऱ्या महेश मोटेला मनसेचा दणका; तोंडाला काळं फासून काढायला लावल्या उठाबशा
- मोठी ऑफर: iPhone 17 Pro Max च्या किमतीत घसरण; मिळतोय 74,990 रुपयांत
- टीकाकारांना कसं सामोरं जायचं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कासव हीच माझी प्रेरणा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









