कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: ‘गोकुळ’वर पाच शासकीय संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून चर्चेत आलेले विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत निशाणा साधला.
‘गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो आणि मथुरेत कंस मामा बोटं मोडितो’, या गाण्याचा संदर्भ देत सध्याची परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी सांगितले. “आता गोकुळात नंदाच्या घरी कृष्ण वाढत असून मंत्रालयात बसलेला कंस मामा बोटं मोडत आहे,” अशी जळजळीत टीका विवेकानंद पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
या मोर्चात सहभागी होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, मी येथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपचा माणूस म्हणून आलेलो नाही, तर केवळ एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा आहे. कोल्हापूरच्या जनतेने जर स्वाभिमानी बंटी पाटील यांच्या पॅनेलला बहुमत दिले असेल, तर चेअरमन त्यांचाच झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
गोकुळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित असून राज्यातील राज्यकर्त्यांना त्यात रस नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. थेट देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पाटील म्हणाले की, तुम्हाला गोकुळची सत्ता मिळावी म्हणून आमच्या म्हशी फळत नाहीत; तर आमच्या धन्याला दूध मिळावे म्हणून त्या फळतात. कष्टकऱ्यांच्या या दुधावर नामनिर्देशित सदस्य लोणी खाणार असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
गोकुळमधील कोंडी फोडायची असेल तर स्वीकृत सदस्यांची नेमणूक करा आणि त्यांना गणपूर्तीसाठी धरा, पण मतदानाचा अधिकार देणे हा दूध उत्पादकांवर थेट अन्याय असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पहाटे अंधारात उठून शेण-घाण काढून आणि धारा काढून आमच्या महिलांचे हात कुजलेत. कोणत्याही नामनिर्देशित संचालकाची बायको धार काढताना मला दाखवा, असे आव्हान देत हे लोक फक्त कागदावरील सहकार बघणारे असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
- व्हिक्टोरियन क्रिकेटमधील बॉल टॅम्परिंगबाबत स्कॉट बोलंडने उस्मान ख्वाजाचे दावे फेटाळले
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







