उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठे खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार आणि ओबीसी समाजाचा मोठा चेहरा असलेले धर्मेंद्र कश्यप यांनी पक्ष सोडण्याचे उघड संकेत दिले आहेत. त्यांनी मध्यरात्री सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवत ‘टाटा बाय-बाय’ लिहिलं आहे. तसेच, माजी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचे कुटुंबही नाराज असून, या घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सामाजिक समीकरणाला मोठा धक्का बसू शकतो.
येत्या 16 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने (सपा) भाजपच्या समीकरणांना ज्याप्रमाणे सुरुंग लावला, तीच रणनीती 2027 च्या निवडणुकीत अवलंबण्याची सपाची तयारी आहे. याला उत्तर म्हणून भाजपने गैर यादव ओबीसी आणि गैर जाटव दलितांवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने भाजपने राज्यसभेसाठी 3 ओबीसी, 2 दलित, 2 ब्राह्मण आणि 1 ठाकूर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी खळबळ
भाजपने राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी देत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षात एकच असंतोष उफाळून आला. यामुळे विशेषतः पासी आणि कश्यप व्होटबँकेत गडबड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुहेलखंडमध्ये दबदबा असलेले आणि आंवला मतदारसंघातून दोनदा खासदार राहिलेले धर्मेंद्र कश्यप प्रचंड अस्वस्थ आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्यावर अन्याय झाला, अशी कश्यप यांची भावना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्यप यांनी भाजप सोडण्याची पूर्ण तयारी केली असून, 18 ऑक्टोबर रोजी ते समाजवादी पार्टीत प्रवेश करू शकतात. ते पूर्वी सपाचेच नेते असल्याने ही त्यांची ‘घरवापसी’ ठरेल. दुसरीकडे, अवधमधील प्रमुख दलित नेते कौशल किशोर यांच्या कुटुंबातही तिकीट नाकारल्याने रोष आहे. कौशल यांचे चिरंजीव, जे भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यांनी “जिथे आपल्या आईवडिलांचा सन्मान होत नाही, तिथे राहण्यात काही अर्थ नाही,” अशी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
धर्मेंद्र कश्यप समाजवादी पार्टीत जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, कौशल किशोर यांचे कुटुंब कुठे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पुढची दिशा स्पष्ट केल्याचे म्हटले असले तरी, चित्र अद्याप धूसर आहे. दरम्यान, सपा नेतृत्व कौशल किशोर यांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक; सरकारला दिला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा अचानक रद्द; देशभरात विरोधक आक्रमक
- शिवसेना कुणाची? न्यायमूर्तींच्या ‘घटनात्मक पाप’ टिप्पणीवर संजय राऊतांचे समाधान; म्हणाले…
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









