वाळकेवाडी, 22 नोव्हेंबर: राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची स्पष्ट कबुली मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. या योजनेबाबत बोलताना झिरवाळ यांनी ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी सरकारची सद्यस्थिती झाल्याचे म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. झिरवाळ म्हणाले की, १९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता, मात्र सध्या अन्नाची टंचाई नाही. परंतु, जर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे अथवा विमानाने पाणी पोहोचवण्याची वेळ आल्यास त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासेल. यामुळे यंदा आणि पुढच्या वर्षीही राज्याला काहीशी आर्थिक चणचण भासू शकते. मात्र, या संकटकाळात सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वाळकेवाडीत बोलताना झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबतही एक सूचक वक्तव्य केले. ‘अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होत आहे,’ असे ते म्हणाले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार असताना घड्याळ एक मिनिटही मागे पुढे होत नव्हते; आता ते थोडे मागे-पुढे होत असले तरी घड्याळ व्यवस्थित सुरू आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र शासनाने जुलै २००४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट (DBT) दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासोबतच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार किंवा कुटुंबातील एका अविवाहित महिलेला पात्र ठरवण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा
- ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकी अहवालातून धक्कादायक माहिती उघड
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉचा हवेत झेपावत अफलातून झेल








