वाळकेवाडी, 22 नोव्हेंबर: ‘अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे-पुढे होत आहे, मात्र ते व्यवस्थित आहे,’ असे सूचक विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील वाळकेवाडी येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार असताना घड्याळ एक मिनिटही मागे-पुढे होत नव्हते. आता त्यात थोडा बदल झाला असला, तरी घड्याळ व्यवस्थित सुरू असल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन झिरवाळ यांच्या हस्ते आज घेण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले. ‘लाडकी बहीण’ योजना आणि संभाव्य दुष्काळाची चाहूल यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची स्पष्ट कबुली खुद्द झिरवाळ यांनी दिली.
१९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता, मात्र सध्या अन्नाची टंचाई नाही. तरीही, पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासेल, असे ते म्हणाले. परिणामी यंदा आणि पुढच्या वर्षीही काहीशी आर्थिक चणचण भासू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या संकटाच्या काळात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही झिरवाळ यांनी शेवटी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा
- ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकी अहवालातून धक्कादायक माहिती उघड
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉचा हवेत झेपावत अफलातून झेल








