🕒 1 min read
नागपूर | प्रतिनिधी: युनियन बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेच्या ‘मराठी विरोधी’ भूमिकेमुळे वातावरण तापलं आहे. एका अपघाती मृत्यूच्या प्रकरणात, बँकेने मराठी भाषेतील एफआयआर नाकारल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “महाराष्ट्रात मराठी चालणार नसेल तर कुठे चालणार?” असा थेट सवाल करत मनसे कार्यकर्त्यांनी युनियन बँकेच्या सेमिनरी हिल्स शाखेसमोर आंदोलन छेडलं. तणाव वाढल्याने पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, नागपूरचे रहिवासी योगेश बोपचे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एटीएम कार्डशी संबंधित दोन लाख रुपयांच्या विमा रकमेचा दावा केला. मात्र, बँकेने ( Union Bank ) एफआयआर मराठीत असल्याने तो नाकारला आणि इंग्रजी किंवा हिंदी अनुवादाची अट घातली. मृताच्या पत्नी आरती बोपचे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “दोन लहान मुलांचं पालनपोषण करताना आम्हाला या पैशांची नितांत गरज आहे, पण बँकेला संवेदनशीलता नाही,” असं स्पष्ट सांगितलं.
MNS protests Union Bank
या प्रकाराची बातमी समोर येताच मनसेने तात्काळ आंदोलनाचा पवित्रा घेतला. “ही बँक महाराष्ट्रात असूनही मराठी एफआयआर नाकारते, हे अत्यंत निंदनीय आहे. जर त्यांनी हे धोरण मागे घेतलं नाही, तर मनसे शांत बसणार नाही,” असा इशारा देत कार्यकर्ते बँक शाखेबाहेर ठिय्या देत बसले.
परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, बँक ( Union Bank ) प्रशासनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मनसेची भूमिका ठाम असून, त्यांनी मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हनीट्रॅपच्या जाळ्यात वरिष्ठ अधिकारी; कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
- प्रवीण गायकवाड हल्ला: संभाजी ब्रिगेड आक्रमक, दीपक काटेचा ‘काटा’ काढणार
- AI Revenge Porn : प्रियकराने AI वापरून गर्लफ्रेंडची बदनामी केली, १० लाख कमावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











