मुंबई: फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये झुरळ, माशा सापडतात. पण, मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एकही कीटक नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयाचा विश्वास बसला नाही. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (FDA Tukaram Mundhe) यांच्या कारवाईचा धडाका सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता हा मोर्चा थेट सरकारी आस्थापनांकडे वळलाय.
विशेष म्हणजे, एफडीएने नुकतीच चक्क हायकोर्टाच्याच कँटीनला नोटीस बजावली. यामुळे या कँटीनला थेट टाळे ठोकण्याची वेळ आली असून, वकील वर्गात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, हॉटेलचालकांनी एफडीएच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने एफडीएची चांगलीच कानउघाडणी केली.
मंत्रालयात एकही कीटक नाही? हायकोर्टाचा सवाल | Tukaram Mundhe
न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर आज ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी चक्क असा दावा केला की, एफडीएच्या तपासणीत मंत्रालयातल्या उपहारगृहात कोणतेही कीटक आढळले नाहीत. यावर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवला. मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या उपहारगृहात साधा एक कीटक नाही म्हणणे, हे अत्यंत हास्यास्पद असल्याचं सांगत कोर्टाने प्रशासनाला खडेबोल सुनावले.
न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना खडा सवाल केला की, मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येही माशी किंवा झुरळ आढळून येतात. मग मंत्रालयातलं कँटीन एवढं कसं काय चकाचक? त्यामुळेच, केवळ कागदोपत्री दावे नकोत. आज दुपारी ३ वाजेपर्यंत चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्वतः मंत्रालयात जाऊन कँटीनची तपासणी करावी. सोबतच या संपूर्ण तपासणीची व्हिडीओग्राफी करण्याचे सक्त निर्देश कोर्टाने दिले आहेत. जर यात कीटक आढळले, तर आम्ही कठोर भूमिका घेतली तर चालेल का? असा सूचक इशाराही कोर्टाने दिला.
कारवाई केवळ खासगी हॉटेल्सवर नको, तर नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचं तर, कोर्टाचा दणका बसताच इकडे मंत्रालयात मोठी धांदल उडाली. तपासणीत अधिकाऱ्यांना कोणतीही त्रुटी दिसू नये, यासाठी किचनपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल असा कट: पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेह १५ फूट खड्ड्यात पुरला
- ‘धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, नाहीतर..’; बावनकुळे यांचा दिपकेला थेट इशारा
- ‘Googleही चुकीचं सांगतं’; सौरव दासचं कंगनाला जोरदार प्रत्युत्तर













