मुंबई, 17 ऑक्टोबर: दरवर्षीप्रमाणे दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. खासदार अनिल देसाई यांनी केलेल्या अर्जानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना पालिकेने २४ कठोर अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत.
महानगरपालिकेच्या पत्रानुसार, १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी आणि २० ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रमासाठी अशी दोन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. २० ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता मैदानाचे वाटप होईल आणि रात्री १२ वाजेपर्यंत ते रिकामे करावे लागेल. या वापरासाठी आयोजकांना प्रतिदिन ५०० रुपये भाडे, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि २५० रुपये परवाना शुल्क पालिका कार्यालयात आगाऊ भरावे लागणार आहे. यासोबतच २० हजार रुपयांची अनामत रक्कमही जमा करणे आवश्यक आहे.
पालिकेने घातलेल्या २४ अटींनुसार, उच्च न्यायालयाच्या रिट याचिका २१८/२०१० च्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असून हे मैदान 'सायलेन्स झोन' आहे. त्यामुळे रात्री १० वाजेनंतर कोणत्याही ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. तसेच मैदानावर कोणत्याही वाहनांना प्रवेश नसेल आणि पार्किंगलाही मनाई असेल. मेळाव्यासाठी पक्के बांधकाम करणे, स्टेजसाठी खोदकाम करणे किंवा खिळे ठोकून मैदानाचे कोणतेही नुकसान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर कचरा, घाण आणि निर्माल्य स्वतः उचलून मैदान स्वच्छ करावे लागेल आणि ते मूळ स्थितीत पालिकेला परत करावे लागेल. मैदानाचे कोणतेही नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल आणि पुढील वर्षीच्या मेळाव्यासाठी परवानगी नाकारली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे आयोजकांसाठी अनिवार्य आहे. ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती असून इतर कोणत्याही परवान्याचा यात समावेश नाही.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असून, आक्षेपार्ह भाषण किंवा गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. परिस्थिती बिघडल्यास परवानगी तत्काळ रद्द केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, जाहिरात व बॅनरसाठी जाहिरात विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे, मैदानात स्वयंपाक न करणे किंवा चूल न पेटवणे, रस्ते व फूटपाथवर अतिक्रमण करून जनतेस अडथळा न करणे, तसेच विद्युत जोडणीसाठी सुरक्षिततेची काळजी घेऊन नियमानुसार परवानगी घेणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक कारणाने किंवा पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही आणि कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा व विम्याची जबाबदारी पूर्णतः आयोजकांवर असेल. पालिकेने कोणत्याही कारणाने परवानगी रद्द केल्यास आयोजकांना कोणतीही भरपाई मागता येणार नाही, तसेच ही परवानगी दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही. या सर्व अटींचा भंग झाल्यास परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना राहील.
शिवसेनेचा दसरा मेळावा १९६६ पासून शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून या मैदानावर मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, यंदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रीतसर परवानगी मिळाल्यामुळे शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा त्यांचाच आवाज घुमणार असल्याचे निश्चित झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अदाणी इन्स्टिट्यूटच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी. लिट.’ पदवी
- शिक्षकांना धमकावल्यास थेट SIT चौकशी! बावनकुळेंचा कडक इशारा; दर्यापुरात सदावर्तेंविरोधात जोडेमार आंदोलन
- अभिजीत दिपके अद्याप बेपत्ता, तर नेहा बोरांना मध्यरात्री वकिलांची भेट; पोलिसांच्या कारवाईवर CJP चा संताप
Quick Answers
महानगरपालिकेने १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी आणि २० ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रमासाठी अशी एकूण दोन दिवसांची परवानगी दिली आहे.
शिवाजी पार्क मैदान हे 'सायलेन्स झोन' असल्यामुळे रात्री १० वाजेनंतर कोणत्याही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मैदानाचे कोणतेही नुकसान झाल्यास २० हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त केली जाईल आणि पुढील वर्षीच्या मेळाव्यासाठी परवानगी नाकारली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा १९६६ पासून शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








