सोलापूर, 31 ऑक्टोबर: सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर प्रस्तावित असलेले डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर हे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा कडक इशारा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे. जगाने आणि गुजरातनेही नाकारलेले, तसेच पाणी आणि वीज खाणारे हे धोकादायक प्रकल्प महाराष्ट्रावर लादल्यास खपवून घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
उजनी धरणावरील या एआय डेटा सेंटर आणि इतर प्रकल्पांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार संजय शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील आणि नवनिर्वाचित पदवीधर आमदार प्रतापसिंह पाटील सहभागी झाले होते. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सलग चार तास रोखून धरण्यात आली होती.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, सेमीकंडक्टरसारखे प्रकल्प आणल्यास त्याचे निश्चितच स्वागत केले जाईल, मात्र हा विनाशकारी प्रकल्प अजिबात स्वीकारला जाणार नाही. शासनाने पुढील दोन महिन्यांत बाधित नागरिकांची लोकसुनावणी घ्यावी आणि जनतेच्या मागणीनुसार हे प्रकल्प तातडीने रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शासनाच्या एका प्रकटनात ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर हे दोन प्रकल्प रद्द झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सामंजस्य करारात (एमओयू) या प्रकल्पांचा समावेश असल्याने शासनाकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा आक्षेप रोहित पवार यांनी नोंदवला. अशी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, हॉटेलमध्ये बसून काम करणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. हा प्रकल्प रद्द झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होत नाही, तोपर्यंत येथे कोणतेही भूमिपूजन होऊ देणार नाही. तरीही प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. महादेव जानकर यांनीही प्रकल्पाला विरोध करत, हे हुकूमशाहीचे सरकार पाडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. अखेर, सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्यावर वादग्रस्त पोस्ट; ‘कधी तुझी नसबंदी होईल…’, महायुतीत शाब्दिक वाद शिगेला
- शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ
- लाडक्या बहिणींची दिवाळी गोड; सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







