Share

“मुंबईत ‘गरबा’ नव्हे, ढोल-ताशाच वाजणार!”; राज ठाकरेंचा अदानींना थेट इशारा, ‘त्या’ एन्काऊंटरवरही संशय!

“विमानतळावर गरबा काय खेळता? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार,” असा सज्जड दम राज ठाकरेंनी अदानी समूहाला दिला.

Published On: 

Raj Thackeray adani

🕒 1 min read

Raj Thackeray Speech: मुंबईच्या विमानतळावर उतरल्यावर तुम्हाला महाराष्ट्राचा फील येतो की गुजरातचा? हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण, खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावर बोट ठेवलंय. “मुंबई विमानतळावर गरबा खेळून तुम्ही मराठीपण पुसून टाकताय का? ही मुंबई आहे, इथे वाजवायचं असेल तर फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजली पाहिजे, बाकी नाटकं नकोत,” अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी अदानींना ठाण्यातील सभेत इशारा दिला आहे.

Raj Thackeray on Gautam Adani Group 

“विमानतळं गन पॉईंटवर घेतली?”

ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या (Gautam Adani) वाढत्या साम्राज्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण देशातील सगळी विमानतळं, बंदरं आणि सिमेंट उद्योग एकाच माणसाच्या घशात का? अदानींनी देशातील विमानतळं ‘गन पॉईंट’वर ताब्यात घेतली आहेत. वाढवण बंदर आणि विमानतळाच्या माध्यमातून मुंबईवरचा मराठी ठसा पुसण्याचा आणि मुंबई गुजरातला जोडण्याचा हा डाव आहे.”

“१५ कोटींची ऑफर नाकारली…”

निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या उधळपट्टीचाही राज यांनी पर्दाफाश केला. कल्याणमधील धात्रक कुटुंबाला उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ कोटींची ऑफर होती, तर राजश्री नाईक यांना ५ कोटी आणि सुशील आवटे यांना १ कोटी देऊ केले होते. “हे पैसे येतात कुठून? मला देणाऱ्यांची नाही, तर घेणाऱ्यांची चिंता वाटते. उद्या तुमची मुलं म्हणतील की, आमचे आई-बाप विकले गेले होते,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच एका बाजूला विकास केल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे मतांसाठी ५-५ हजार वाटायचे, या विरोधाभासावरही त्यांनी (Raj Thackeray) बोट ठेवले.

बदलापूर एन्काऊंटर आणि फडणवीस

बदलापूरच्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) एन्काऊंटर प्रकरणावरही राज यांनी संशय व्यक्त केला. “त्याला एन्काऊंटरमध्ये का मारलं? काही गुपित लपवायचं होतं का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, बलात्काराचा आरोप असलेल्या आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याबद्दल संताप व्यक्त केला. दुसरीकडे, ‘मुंबई महाराष्ट्राची नाही’ असं म्हणणाऱ्या अण्णामलाईची पाठराखण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याबद्दल राज यांनी खंत व्यक्त केली. “आमचेच लोक ससाण्यासारखे वागून आमचाच घात करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)