प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या दिलखेचक लावणीने आणि कसदार अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर (Madhu Kambikar) यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीचा आणि लोककलेचा एक सुवर्णकाळ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या सुनेने या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या आणि अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर एकदा लावणी सादर करत असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) मोठा झटका आला. तेव्हापासून त्या आजारपणाशी झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
Madhu Kambikar Death
बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथे २८ जुलै १९५३ रोजी जन्मलेल्या मधू कांबीकर यांचा कलाक्षेत्रातील प्रवास मुळीच सोपा नव्हता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. कथ्थकचं रीतसर प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ च्या सुमारास मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘झपाटलेला’, आणि ‘एक होता विदूषक’ यांसारखे त्यांचे गाजलेले चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत.
केवळ रुपेरी पडद्यावरच नाही, तर १९७७ मधील ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आणि ‘सखी माझी लावणी’ यांसारख्या कार्यक्रमांतून त्यांनी थेट अमेरिका, दुबई आणि मॉरिशसपर्यंत मराठी लोककलेचा झेंडा रोवला. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचं धडेही दिले होते. त्यांच्या जाण्याने आपण खऱ्या अर्थाने मातीशी नाळ जोडलेला एक अस्सल कलाकार गमावला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांची स्पष्ट भूमिका: ‘आमचा तुकाराम मुंढेंवर विश्वास, पण सरकारवर नाही’
- बाल लैंगिक शोषण प्रकरणात पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची शिक्षा; आंतरराष्ट्रीय टोळीचा होता म्होरक्या
- शाहरुख खान, अजय देवगणची गय नाहीच; जाहिरातींवरून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









