नवी मुंबई, 17 नोव्हेंबर: नवी मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकारी असल्याची बतावणी करत पानटपरी चालकांकडून पैसे उकळणाऱ्या एका टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईची भीती दाखवून लुटमार करणाऱ्या या टोळीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीने ४ नोव्हेंबर रोजी कोपरी येथील अभिलाष पांडे या पानटपरी चालकाला लक्ष्य केले होते. स्वतःची ओळख एफडीए अधिकारी म्हणून सांगत चार जणांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर कारवाईचा धाक दाखवत पांडे यांना इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये बसवून कोपरी ते कोपरखैरणे दरम्यान फिरवले व त्यांना मारहाणही केली.
आरोपींनी मारहाण करत पांडे यांच्या मोबाईलवरून १ लाख ८६ हजार रुपये ऑनलाइन स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. याच वेळी त्यांच्या एका साथीदाराने पांडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडून ८० हजार रुपये उकळले. अशा रितीने एकाच पानटपरी चालकाची तब्बल २ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी प्रशांत शिंदे, सत्येंद्र रस्तोगी, अथर्व भोसले, प्रथमेश गायकर, अंकुश पवार आणि उमेश कोडग या सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) झेंडा लावलेली इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली आहे. तसेच फसवणुकीतील २ लाख ६६ हजार रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
अटकेत असलेल्या या आरोपींकडे ‘फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेल्फेअर कमिटी’ या नावाची बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. विशेष म्हणजे, या टोळीत काम करणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी रिक्षाचालक, टॅटू आर्टिस्ट, पेट्रोल पंप कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी आणि बसचालक अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवार प्रसिद्धीसाठी हपापलेले, त्यांच्यात अजितदादांची जागा घेण्याची पात्रता नाही; गिरीश महाजनांचा पलटवार
- ‘आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल’; अजितदादा प्रकरणावरून प्रवीण दरेकरांचा रोहित पवारांना थेट इशारा
- राष्ट्रवादीतून लाथाडलं म्हणून रोहित पवारांचे आरोप; चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक दावा








