प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून लाथाडल्यामुळेच रोहित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. आरोप करण्यापूर्वी त्यांनी आधी स्वतःची उंची ओळखावी, असा टोला लगावतानाच बावनकुळे यांनी रोहित पवारांना प्रसिद्धीची हाव सुटल्याचे म्हटले आहे.
विमान कंपनीच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ज्या कंपनीवरून आरोप होत आहेत, त्यांच्या विमानाने राज्यातील ९० टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल. स्वतः रोहित पवार यांनीही अनेकदा या विमानाने प्रवास केला असून त्याचे फोटोही उपलब्ध आहेत. केवळ प्रवास केला म्हणजे त्यांचे संबंध आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. रोहित पवार अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण करत असून, त्यांनी शरद पवारांकडून संस्कार शिकायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
अमित शहा यांच्या हस्ते झालेल्या ‘दिवंगत नेते अजित पवार’ यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रोहित पवारांना रुचला नाही, त्यामुळेच त्या कार्यक्रमाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक हे आरोप केल्याचा दावा बावनकुळेंनी केला. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी एकमेकांना भावासारखे सांभाळले आहे. रोहित पवार यांच्या बालिश राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असून, या आरोपांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ छोटे करण्याबाबत मांडलेल्या भूमिकेवरही बावनकुळेंनी भाष्य केले. सध्या ३०० किलोमीटरचे लोकसभा आणि दीडशे किलोमीटरचे विधानसभा क्षेत्र असून, तिथे ४०-४० लाख लोकसंख्या आहे. विकसित भारताच्या संकल्पासाठी आणि प्रशासकीय सोयीसाठी डीलिमिटेशन आवश्यक आहे. या प्रक्रियेला सुप्रिया सुळे मदत करत असतील तर आपण त्यांचे अभिनंदन करू, असे बावनकुळे म्हणाले. पक्षात कुणी विचारत नसल्याने आणि शरद पवार गटातून बाहेर पडण्यासाठीच रोहित पवार जाणीवपूर्वक अशी रेष ओढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘अजितदादांची जी काही दुर्घटना झाली’, त्याचा पूर्ण पर्दाफाश झाला पाहिजे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस सार्वजनिकरित्या काही न बोलता खूप प्रयत्न करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. कौटुंबिक संबंध असलेल्या व्यक्तींनी असे आरोप करणे दुःखद आहे. मात्र, या आरोपांमुळे फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्यावर मानहानीचा खटला (डिफेमेशन) दाखल करण्याऐवजी, जनतेच्या मनातून रोहित पवारांची प्रतिमा खाली येणे, हेच त्यांच्यासाठी मोठे डिफेमेशन असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२७: जोफ्रा आर्चरच्या साथीला मोहम्मद शमी, राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी झाली अधिक घातक!
- थंड आणि कोरड्या हवेत टाचांना पडल्यात भेगा? मऊ पायांसाठी सोपे घरगुती उपाय
- नॅथन एलिस दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर; ऑस्ट्रेलियाच्या संघात बेन ड्वारशुईसची एन्ट्री








