प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने एक मोठा ट्रेड करत आपला गोलंदाजी विभाग अधिक मजबूत केला आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि तमिळनाडूचा फिरकीपटू एम. सिद्धार्थ यांना लखनौ सुपर जायंट्सकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन खेळाडूंच्या बदल्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी राजस्थानच्या संघात दाखल होणार आहे.
आगामी हंगामासाठी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर (मंगळवार) आहे. या यादीची घोषणा होण्यापूर्वी अवघे काही तास शिल्लक असतानाच राजस्थानने हा महत्त्वपूर्ण ट्रेड केला आहे. तसेच, आयपीएल २०२७ साठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे.
मोहम्मद शमीच्या आगमनाने राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी आक्रमण आणखी भेदक होणार आहे. जगातल्या सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा जोफ्रा आर्चर आणि आपल्या स्विंगने फलंदाजांना घाम फोडणारा मोहम्मद शमी आता राजस्थानकडून गोलंदाजीची सुरुवात करताना दिसतील. या दोघांच्या जोडीमुळे संघाची ताकद लक्षणीय वाढणार आहे.
राजस्थानसाठी पॉवरप्लेमधील गोलंदाजी ही चिंतेची बाब होती. मागील हंगामात राजस्थानने पॉवरप्लेमध्ये १०.१४ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. दुसरीकडे, २०२४ च्या आयपीएलपासून शमीने पॉवरप्लेमध्ये ८.७६ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत तब्बल १४ बळी मिळवले आहेत. २०२७ च्या हंगामात शमीने अशीच कामगिरी केल्यास राजस्थानची मोठी अडचण दूर होऊ शकते.
लखनौ सुपर जायंट्समध्ये येण्यापूर्वी मोहम्मद शमी सनरायझर्स हैदराबाद आणि त्याआधी गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग होता. तर, दुसरीकडे सॅम करन दुखापतीमुळे मागील हंगाम खेळू शकला नव्हता. त्यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि पंजाब किंग्स संघाकडून खेळला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- थंड आणि कोरड्या हवेत टाचांना पडल्यात भेगा? मऊ पायांसाठी सोपे घरगुती उपाय
- नॅथन एलिस दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर; ऑस्ट्रेलियाच्या संघात बेन ड्वारशुईसची एन्ट्री
- अब्दुल कादिरना मारलेले सिक्स लक्षात राहिले, पण कसोटीतली ‘ती’ खेळी दुर्लक्षित; पहिल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत सचिनने व्यक्त केली खंत








