🕒 1 min read
मुंबई: परदेशातून भारतात पाऊल ठेवताच एखाद्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जावी, का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरात चर्चेत आहे. निमित्त ठरलंय ते, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डॉक्टर संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांच्यावर मुंबईत झालेली कारवाई. लंडनहून मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संग्राम पाटील हे लंडनहून मुंबईत आले असता, पोलिसांनी (गुन्हे शाखेने) त्यांना विमानतळावरच अडवले. त्यांच्या विरोधात भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केली असून, १८ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी फेसबुकवर भाजप नेत्यांबद्दल आणि पक्षाबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत आहे.
Dr Sangram Patil Detained by Mumbai Police
या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “ही तर बिनडोक कारवाई आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी संताप व्यक्त केला असून, “फडणवीस, अक्कल गहाण टाकली की काय?” असा तिखट सवाल त्यांनी विचारला आहे. दुसरीकडे, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी याला पोलिसांचा ‘छळवाद’ म्हणत पहाटे २ वाजल्यापासून पाटील दाम्पत्याला नाहक बसवून ठेवल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाला आता उग्र वळण लागलं असून, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारला थेट अल्टीमेटम दिला आहे. पवार म्हणाले की, “कुणी विरोधात भूमिका मांडली म्हणून सत्तेचा गैरवापर खपवून घेणार नाही. सरकारने त्यांची तत्काळ सुटका करावी, अन्यथा डॉ. संग्राम पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या सकाळीच त्या ठिकाणी यावं लागेल.”
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही या घटनेचा निषेध करत, ” भारतात लोकशाही जिवंत आहे का ? डॉ संग्राम पाटील (Dr Sangram Patil) यांना इंग्लंडहून मुंबई विमानतळावर येता क्षणीच गुन्हे शाखेने अटक केली. याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना केलेली अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. डॉ. पाटील यांना नेमकी कोणत्या कारणामुळे अटक केली, याचा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने खुलासा करावा. या दडपशाहीचा आम्ही काँग्रेस पक्ष धिक्कार करतो.” अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे.
डॉ. पाटील यांना अटक होणार की केवळ ‘गुड बिहेवियर बॉण्ड’ (Good Behavior Bond) लिहून सोडून देणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, या घटनेने ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीस-शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा डाव? रश्मी शुक्लांच्या ‘त्या’ रिपोर्टने राजकारणात भूकंप!
- Uddhav Thackeray: “हे काय गोट्या खेळायला एकत्र आलेत?”; ठाकरेंचा भाजपवर गंभीर वार!
- ‘भावा, प्लीज ओपनिंगला ये…’; पंतच्या T20 करिअरला वाचवण्यासाठी ‘या’ दिग्गजाचा कळकळीचा सल्ला!
- IND vs NZ: वडोदऱ्यात भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? रोहित-विराट पुन्हा ‘विराट’ विक्रम करणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










