पैठण | किरण काळे पाटील: तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ व २६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण झाले. गावपातळीवरच दर्जेदार, सर्वसमावेशक आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी आयोजित या प्रशिक्षणात ५२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले आणि माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. नियमित प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
या दोन दिवसांत सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवेतील १३ प्रमुख घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यात गरोदर माता व प्रसूतीपश्चात काळजी, नवजात व बालकांचे आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजार आणि सामान्य आजारांवरील उपचार यांचा समावेश होता. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, डोळे व कानांचे आरोग्य, मौखिक आरोग्य, वृद्धांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य आणि योग व आयुष पद्धतींविषयीही माहिती दिली.
गावपातळीवरच आजारांचे वेळेत निदान व उपचार करून अनावश्यक रुग्ण संदर्भीकरण टाळण्यावर प्रशिक्षणात विशेष भर राहिला. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, नियमित गृहभेटी आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे या बाबीही यावेळी अधोरेखित केल्या.
रुग्णसेवेसाठी तांत्रिक ज्ञानासोबतच रुग्णांशी संवेदनशील संवाद, नेतृत्वगुण आणि सकारात्मक देहबोलीही तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रशिक्षणात स्पष्ट केले. या सत्रांमध्ये डॉ. भाग्यश्री साळुंके, डॉ. आशिष वानखेडे, श्रीमती सावरगावे, डॉ. दिपाली कुलकर्णी, प्रफुल ताकवाले, सागर तांबे आणि रोहित भोसले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे नियोजन आणि तयारी शिवनाथ तावडे, शाखा सदस्य संदीप पवार, प्रमोद अडसुळ, सिद्धार्थ म्हस्के, स्वप्नील परदेशी, मच्छिंद्र गाडेकर आणि महेंद्र साळवे यांनी केली. आरोग्य सेवक संतोष शिरसाठ यांनी आभार मानले.








