प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला असून, सकाळी गारठा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यावर एकाच वेळी थंडी आणि पावसाचे असे दुहेरी संकट पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यात पहाटे आणि रात्री गारठा तर दुपारी उकाडा अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून, जळगाव आणि नाशिकमध्येही हुडहुडी कायम आहे. एकीकडे ही परिस्थिती असतानाच सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांत आज थेट पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात फार जास्त थंडी नसणार असल्याचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी तापमानात चढउतार राहील आणि हवामान कोरडे राहील. तसेच दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवेल. मराठवाड्यातही दिवसा कोरडे हवामान तर रात्रीच्या वेळी गारठा जाणवेल. येथील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर पश्चिम दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे डोंगरभागात तापमान उणे पातळीवर गेले आहे. राज्यामध्ये आधीच सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळामुळे काही भागांत पाऊस झाला होता. आता पुन्हा तापमानात आणि हवामानात होणारे हे सततचे बदल नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.








