प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या एका विधानावरून आता राजकीय वाद पेटला आहे. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम जमत नाही, असे विधान रोहित पवार यांनी केले होते. यावरून अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले असून, त्यांनी रोहित पवार यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची वेळ आल्याची खोचक टीका केली आहे.
पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाष्य करताना आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पुण्यासाठी एखादा कडक पालकमंत्री द्यावा किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यास पुण्याचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले होते. या विधानानंतर त्यांनी व्यक्तिगत माफी मागितली असली, तरी एका शब्दावरून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच वाढला आहे.
रोहित पवारांच्या या विधानाला अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर देताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत असतात. जर ते स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरच असे बोलत असतील, तर त्यांना आता एखाद्या ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये’ दाखवण्याची वेळ आली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःला कर्तबगार दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच कुटुंबावर शिंतोडे उडवणे थांबवावे, असा सल्लाही शेळके यांनी दिला.
अजित दादांच्या अकाली जाण्यामुळे सुनेत्रा वहिनींवर अचानक ही जबाबदारी आली असल्याचे सांगत शेळके यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. सुनेत्रा पवार एक महिला असूनही सकाळी ०७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात आणि कठीण परिस्थितीतही बारामती, पुणे जिल्हा, राज्य आणि पक्षाच्या जबाबदाऱ्यांसह सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाही उत्तमरीत्या सांभाळत असल्याचे ते म्हणाले.
महायुती सरकारमध्ये कोणाला कोणते पद द्यायचे, हे आमचे नेते ठरवतील; त्यामुळे रोहित पवारांनी आमच्या पक्षात आणि महायुतीत नाक खुपसण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत, असा टोला लगावत शेळके यांनी रोहित पवारांना स्वतःच्या पक्षात किती किंमत उरली आहे याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.








