प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत (NDA) सहभागी झाल्यास, रोहित पवार यांच्याकडून स्वतंत्र रणनीतीची चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यासाठी पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेण्यात आलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर शरद पवार गटाने एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्यासोबत न जाणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची रोहित पवारांकडून जुळवाजुळव सुरू आहे. काँग्रेस विचारांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्यासोबत जोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, ते काँग्रेससोबत जाण्याच्या किंवा स्वतंत्र भूमिका घेण्याच्या पर्यायांवर विचार करत आहेत.
या रणनीतीचा भाग म्हणून रोहित पवारांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या टीमकडून संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एक यादीही तयार करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत, आवश्यकता भासल्यास सोबत येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीच्या तिकिटांचे आश्वासन देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे समजते. शरद पवार गटाच्या संभाव्य एनडीए प्रवेशानंतर स्वतःची राजकीय बाजू भक्कम करण्यासाठी रोहित पवारांकडून ही तयारी केली जात असल्याचे मानले जात आहे.








