जोधपूर, 22 नोव्हेंबर: राजस्थानमधील जोधपूर येथे एका १९ वर्षीय युट्यूबरचे बचत खाते विनाकारण गोठवणे भारतीय स्टेट बँकेला (SBI) चांगलेच महागात पडले आहे. जोधपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने बँकेला दणका देत हे खाते त्वरित सुरू करण्याचे आणि संबंधित तरुणाला १५,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण जोधपूर जिल्ह्यातील नेवरा गावात राहणाऱ्या अर्जुन नावाच्या तरुणाशी संबंधित आहे. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरून मिळणारी कमाई जमा करण्यासाठी एसबीआयच्या नेवरा रोड शाखेत खाते उघडले होते. १९ मे २०२३ रोजी अर्जुनने आपल्या चॅनेलच्या प्रमोशनसाठी गुगलच्या माध्यमातून प्रत्येकी १,००० रुपयांचे तीन व्यवहार केले होते.
अर्जुनने हे खाते विद्यार्थी म्हणून उघडल्याने बँकेच्या यंत्रणेला हे व्यवहार संशयास्पद वाटले. या व्यवहारांचे स्पष्टीकरण मागण्यासाठी त्याला नोटीस पाठवल्याचा दावा बँकेने केला. मात्र, या नोटिशीला उत्तर न मिळाल्याने बँकेने ३१ मे २०२३ रोजी त्याचे खाते गोठवले. त्यामुळे अर्जुनला त्याचेच पैसे काढणे अशक्य झाले.
याप्रकरणी अर्जुनने ग्राहक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर बँकेचा मनमानी कारभार उघड झाला. सुनावणीत बँक हे सिद्ध करू शकली नाही की अर्जुनचे व्यवहार बेकायदेशीर होते किंवा तो चुकीच्या कामात अडकला होता. तसेच, खाते गोठवण्यापूर्वीची नोटीस ग्राहकापर्यंत पोहोचल्याचा कोणताही पुरावा बँक देऊ शकली नाही.
बँकेच्या या कृतीला सेवेतील गंभीर त्रुटी मानत ग्राहक आयोगाने एसबीआयला केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यांत खात्यावरील बंदी हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अर्जुनला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल १०,००० रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी ५,००० रुपये असे एकूण १५,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बँकेला देण्यात आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा
- ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकी अहवालातून धक्कादायक माहिती उघड
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉचा हवेत झेपावत अफलातून झेल








