अहिल्यानगर, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या चर्चांना ब्रेक लावला आहे. या घडामोडींवर अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून, आमचा नेता खंबीर आहे, ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असे त्यांनी सांगितले आहे.
खासदार लंके यांनी स्पष्ट केले की, विलिनीकरणाच्या केवळ चर्चा सुरू असून आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून अशा राजकीय चर्चांमध्ये सहभागी होत नाही. सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा कुटुंबप्रमुख सक्षम असतो, तेव्हा आपण चर्चा करण्याला अर्थ नसतो, असेही ते म्हणाले.
शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे सक्षम नेतृत्व करत असल्याने असल्या चर्चांमध्ये पडण्याची आवश्यकता नसल्याचे लंके यांनी नमूद केले. केंद्रात सत्तेत जाण्याबाबतही कोणतीही चर्चा झाली नसून या केवळ वावड्या उठवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत मिळवून देणे हेच सध्या आमच्यासाठी प्राधान्याचे असल्याचे लंके म्हणाले.
दुसरीकडे, मुंबईत पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ‘माझा भाऊ होता तोपर्यंत विलिनीकरण होणार होते आणि त्याची तारीखही ठरली होती. मात्र ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्यानंतर याला पूर्णविराम मिळाला,’ असे सुळे म्हणाल्या. आमच्या एकाही नेत्याने याबाबत कोणतेही विधान केले नसून, या विलिनीकरणाच्या चर्चांचा आता मला कंटाळा आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले होते. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी या चर्चा नाकारल्या होत्या. त्यामुळे सध्यातरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्ग वेगळेच राहणार असल्याचे चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटची आठवण आली; आर. अश्विनची मोठी कबुली
- गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मते चोरली; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
- सूर्यकुमार यादवचं दणदणीत कमबॅक! १५ चेंडूत अर्धशतक झळकावत श्रेयस अय्यरला दिला धोक्याचा इशारा








