पुणे, 13 नोव्हेंबर: राज्यात सध्या दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. हिवाळ्याची चाहूल लागलेली असली तरी, यंदा महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाच्या हिवाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त उबदार राहण्याचे संकेत आहेत.
सध्या महाराष्ट्रात उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे गेल्या चार ते पाच दिवसांत किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली आहे. आगामी तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी काही अंशी घट अपेक्षित असली, तरी ती फार मोठी नसेल.
राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात तापमानात काहीसा फरक जाणवणार आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आणखी एक ते दोन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही काळ दक्षिण-पूर्व दिशेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने, वाऱ्याची दिशा बदलल्यास दक्षिण महाराष्ट्रातील तापमानात किंचित वाढ होऊ शकते. एकूणच किमान तापमान घसरणीकडे राहण्याचा कल आहे.
सध्या दिवसा आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडतो आणि कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. मात्र, रात्रीच्या वेळी उत्तरेकडून येणारे थंड व कोरडे वारे आणि जमिनीवरील उष्णता ‘दीर्घलहरी प्रारणाच्या’ स्वरूपात वेगाने बाहेर पडत असल्याने पहाटे चांगलाच गारवा जाणवतो. असे असले तरी, राज्यात ‘थंडीची लाट’ घोषित करण्याइतपत तापमानात मोठी घसरण झालेली नाही आणि आगामी काळातही तशी शक्यता कमी आहे.
यंदाच्या हिवाळ्यावर प्रशांत महासागरातील एल निनोचा मोठा प्रभाव असणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या महत्त्वपूर्ण कालावधीत एल निनोची स्थिती मजबूत ते अतिशय मजबूत स्वरूपात असेल. यामुळे भारतातील बहुतांश भागांत थंडीच्या कालावधीत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील, असा अंदाज विभागाने आधीच वर्तवला होता. दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील थंडीचे नेमके स्वरूप कसे असेल, याचा सविस्तर अंदाज नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १२ फेब्रुवारीलाच विलिनीकरण झाले असते; सुनील तटकरेंचा मोठा दावा, हॉस्पिटलमधील भेटीचाही उलगडा
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांचा दावा खराच असावा; चर्चेचे साक्षीदार असल्याचं सुनील तटकरेंचं वक्तव्य
- भारताचा ८९ धावांवर खुर्दा; चौथ्या वनडेतील लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरचा संताप








