प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वक्तव्यातून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. जर अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजीच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते, असा मोठा दावा तटकरे यांनी केला आहे. या विलिनीकरणाबाबत स्वतः अजितदादांनीच आपल्याला पूर्वकल्पना दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या बैठकांसंदर्भात केलेला दावा पूर्णपणे खरा असल्याचे तटकरे यांनी मान्य केले. एशियन हॉस्पिटलमध्ये भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा तटकरे त्यांना भेटायला गेले होते. त्यापूर्वीच अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट होऊन विलिनीकरणावर बैठक झाली होती. भुजबळ यांनी हॉस्पिटलमधूनच या चर्चेत सहभाग घेतला असावा, त्यामुळे ते जे सांगत आहेत त्यात काहीही चुकीचे वाटत नाही, असे तटकरे म्हणाले.
अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते, मग दादा गेल्यानंतर मी यावर आधी का भाष्य केले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, कोणत्या वेळी काय बोलायचे याची मला समज आहे. तेव्हा न बोलता आता बोलत आहे, या प्रश्नात काहीही तथ्य नाही. हा ज्याचा त्याचा विषय असून योग्य वेळ आल्यावर यावर आणखी बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून टीका करणारे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचाही तटकरे यांनी समाचार घेतला. सामंत हे एकेकाळचे राष्ट्रवादीतील सहकारी होते. लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आमचाही थोडा वाटा होता, नसेल तर त्यांनी तसे सांगावे, असा टोला तटकरे यांनी लगावला. आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदर करतो आणि त्यांच्या पक्षाबाबत बोलत नाही. आमचा पक्ष वेगळा असल्यामुळे मी काय बोलावे, यावर सामंत किंवा इतरांनी बोलण्याची गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांचा दावा खराच असावा; चर्चेचे साक्षीदार असल्याचं सुनील तटकरेंचं वक्तव्य
- भारताचा ८९ धावांवर खुर्दा; चौथ्या वनडेतील लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरचा संताप
- छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न; राज ठाकरेंचा गंभीर आरोप








