प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निकालानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारले, तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल,” असा थेट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
सतेज पाटील यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला फक्त शिक्षणमंत्री म्हणून आदेश दिला, तरी बंटी पाटलांचं काहीच शिल्लक राहणार नाही. “तुमच्यात धमक असेल तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये कामं घेऊन जाऊ नका, राहुल गांधींकडून ती कामं करून घ्या,” असं आव्हानही त्यांनी दिलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि त्यांच्याकडूनच कामे करून घ्यायची, या शब्दांत पाटील यांनी सतेज पाटलांना लक्ष्य केलं.
दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा पंधरा दिवसांनी सुटला आहे. कोरमअभावी तहकूब झालेल्या या सभेची कोंडी अखेर फुटली असून १० नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. न्यायालयाने अंतिम निकालाची तारीख राखून ठेवत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झालेल्या प्रक्रियेत महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे राजेश पाटील आणि सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यात लढत झाली, ज्यामध्ये राजेश पाटील विजयी झाले.
या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रियेत गोकुळ दूध संघाच्या २५ निवडून आलेल्या संचालकांनी आणि शासनाने नियुक्त केलेल्या ४ संचालकांनी सहभाग घेतला होता. या विजयासोबतच महायुतीने गोकुळच्या अध्यक्षपदावर आपला दावा सिद्ध केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
- आयपीएल घोषणेपूर्वीच अर्शदीप सिंगच्या मुंबई इंडियन्स प्रवेशावर वडिलांचे शिक्कामोर्तब
- २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा समावेशाची शक्यता, पुणे आणि वडोदरा फ्रँचायझी शर्यतीत आघाडीवर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








