प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रचंड लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर. अभिनयासोबतच दिग्दर्शनातही आपला वेगळा ठसा उमटवणारे अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पत्नी सुप्रिया यांच्याबद्दल एक खास किस्सा शेअर केला आहे. सुप्रिया यांच्याबरोबर काम करत असताना आपण आधी त्यांच्या कामाच्या प्रेमात पडलो आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच त्यांना लग्नाची मागणी घातल्याचा खुलासा सचिन यांनी केला.
लग्नानंतरच्या एका विलक्षण योगायोगाची आठवणही त्यांनी या मुलाखतीत सांगितली. २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांना कन्यारत्नाची म्हणजेच श्रियाच्या जन्माची बातमी समजली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचे चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या आनंदाच्या दिवशी ‘बनवाबनवी’ चित्रपटासाठी सचिन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर सुप्रिया यांना ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या अविश्वसनीय योगायोगावर बोलताना सचिन म्हणाले की, हे सगळं जर एखाद्या पुस्तकात लिहिलं किंवा सिनेमात दाखवलं असतं, तर ते खूप खोटं वाटलं असतं. पण आमच्या घरात एका बाहुलीने दोन बाहुल्या आणल्या होत्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुप्रिया आणि श्रिया या दोघीही अतिशय टॅलेंटेड असल्याचं सांगत, एक अभिनेत्री म्हणून सुप्रिया आपल्यापेक्षा उजवी असल्याचे आपण शंभर टक्के मानतो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
मुलगी श्रियाबद्दल बोलताना त्यांनी विशेष अभिमान व्यक्त केला. श्रिया ही आम्हा दोघांपेक्षा वेगळी असून तिने स्वतःचे स्थान स्वतः निर्माण केले असल्याचे ते म्हणाले. तिच्यासाठी आम्हाला कधीही संघर्ष किंवा शिफारस करावी लागली नाही. केवळ पत्नी आणि मुलगी म्हणून नव्हे, तर दोन दर्जेदार कलाकार म्हणून या दोघी आपल्या आयुष्यात असणे ही परमेश्वराची कृपा असल्याचे सचिन पिळगावकर यांनी अभिमानाने सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टपासून सोन्याच्या दरात तब्बल २३ हजारांची घसरण; चांदीही ५६ हजारांनी स्वस्त
- शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








