अमरावती, 16 ऑक्टोबर: राज्याच्या विधान परिषदेतील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत तणाव आणि बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या किरण सरनाईक यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सावध पावले उचलत मोठी राजकीय खेळी केली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत फेटाळण्यात आला. त्यामुळे सध्या या निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार रिंगणात नाही. हीच संधी हेरून मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष दूत ॲड. निलेश देशमुख यांनी मुंबईतील दादर येथे थेट 'राजगृह' गाठले. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उमेदवार किरण सरनाईक यांना मदत व पाठिंबा देण्याची विनंती केली.
या महत्त्वपूर्ण भेटीनंतर ॲड. देशमुख यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा दौरा करत 'डॅमेज कंट्रोल'ला सुरुवात केली आहे. त्यांनी अकोल्यात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. तसेच अकोल्यातील वंचितच्या एका नगरसेवकाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. याशिवाय, पातूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिक्षण संस्थाचालक सय्यद बुऱ्हाण नबी यांच्याशीही त्यांनी मतदारसंघातील पाठिंब्याबाबत व काही स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशावर सकारात्मक चर्चा केली.
दुसरीकडे, भाजप नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारल्याने महायुतीची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. तिवसा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याचबरोबर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनीही माघार घेण्यास नकार दिला आहे. भाजपने या दोन्ही प्रमुख बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली असली, तरी ते निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत.
भाजपच्या या बंडखोरीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आपल्या बंडखोरांना शांत करून किरण सरनाईक यांचा प्रचार करावा, अन्यथा राज्याच्या इतर जागांवर शिवसेना 'महायुती धर्म' पाळणार नाही, असा थेट इशाराच भाजपला देण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेलाही स्वपक्षातील बंडखोरीचा फटका बसत आहे. शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांना शांत करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे. शिवसेना आणि भाजपमधील या अभूतपूर्व बंडखोरीमुळे तसेच वंचितच्या संभाव्य भूमिकेमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघाची २०२६ ची ही लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; ‘सीजेपी’ आणि राहुल गांधींवर गंभीर आरोप
- प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येसाठी पप्या शिंदेने चप्पलेऐवजी बूट का घातले? पोलीस तपासात मोठं कारण उघड
- उत्तर प्रदेशात भाजपला मोठं खिंडार; माजी खासदाराचा समाजवादी पक्षात प्रवेश, अनेक आमदारही संपर्कात असल्याचा अखिलेश यादवांचा दावा
Quick Answers
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष दूत ॲड. निलेश देशमुख यांनी मुंबईतील दादर येथे 'राजगृह' गाठून प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि उमेदवार किरण सरनाईक यांना मदत व पाठिंबा देण्याची विनंती केली.
भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






