मुंबई, 15 ऑक्टोबर: राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपने दिलेल्या आव्हानाचे उट्टे आता पुण्यात काढले जात असल्याची चर्चा आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर त्यांनी माघार घेतली. पुण्याची जागा हातून गेल्याने शिवसेनेमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने बंडखोर सचिन सानप यांना बळ दिले आहे. सानप यांनी यापूर्वी शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहिले आहे.
या भूमिकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, "आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहोत, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आमचा पाठिंबा सचिन सानप यांना आहे." ते पुढे म्हणाले की, महायुती म्हणून लढत असलो तरी काही ठिकाणी अपवाद आहेत आणि तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील. तसेच, महायुतीच्या सर्व पाचही जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमरावतीमधील या बंडखोरीचे पडसाद पुणे आणि संभाजीनगरमध्येही उमटण्याची शक्यता आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर भाजपचे बंडखोर दिलीप कडू यांनी आव्हान उभे केले आहे. दिलीप कडू हे अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक होते आणि त्यांना राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. कडू आणि खोडके यांनी सरनाईक यांना पाठिंबा न दिल्यास, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात (संभाजीनगर) शिवसेना वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरावतीतील बंडखोरीचा फटका महायुतीला इतरत्रही बसण्याची चिन्हे आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अपक्ष उमेदवार सचिन सानपांना शिवसेनेचा पाठिंबा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यातून मोठी घोषणा
- यूपीए काळातच EVM आले, आता विरोधकांचे बिनकामाचे राजकारण; प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
- नाना पाटेकर की कॅप्टन स्मित मच्छर? विद्याविहार जोडपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापले, महापौरांची भूमिका स्पष्ट
Quick Answers
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सचिन सानप यांनी यापूर्वी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहिले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप कडू यांनी आव्हान उभे केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







