माजलगाव, 14 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णवाहिकेमध्ये डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने एका बेशुद्ध चिमुरडीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले. यानंतर हतबल झालेल्या पित्याला आपल्या बेशुद्ध मुलीला चक्क खांद्यावर घेऊन दुसरे रुग्णालय गाठावे लागले. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचवीत शिकणाऱ्या या मुलीला अचानक फिट आल्याने ती बेशुद्ध पडली होती. उपचारांसाठी तिला दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर मुलीला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देत रेफर लेटर देण्यात आले. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने खासगी वाहन करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आजीने शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली होती.
रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर मुलीचे वडील तिला घेऊन आत बसले. मात्र, यावेळी त्यांच्याकडे डिझेलसाठी पैशांची मागणी करण्यात आली. 'आम्ही मोलमजुरी करून जगतो, आमच्याकडे पैसे नाहीत,' असे कुटुंबीयांनी सांगितल्यावर डॉक्टरांनी संतापजनक वक्तव्य केले. 'पैसे नाहीत तर मुलीला जन्मच कशाला दिला?' असा उद्वेगजनक सवाल डॉक्टरांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैसे नसल्यामुळे अखेर त्या बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले.
तातडीने उपचारांची गरज असताना रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्यामुळे हताश झालेल्या बापाने दुसरा पर्याय नसल्याने बेशुद्ध मुलीला थेट खांद्यावर घेतले आणि दुसऱ्या रुग्णालयाकडे धाव घेतली. तिथे उपचार मिळाल्यानंतर मुलगी शुद्धीवर आली व कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले. या मुलीच्या डोक्यावरून सहा वर्षांपूर्वीच आईचे छत्र हरपले आहे. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाने मुलीच्या पुढील उपचारांसाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी मदत करावी, अशी विनंती केली आहे.
या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फोनवरून बोलताना दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना डॉक्टर निलेश ढाकणे यांनी सांगितले की, मुलगी बेशुद्ध अवस्थेत आल्यावर तिला शुद्धीवर आणण्यासाठी आपण स्वतःच्या पैशांतून इंजेक्शन दिले. तसेच, "माझ्या तोंडून जे काही शब्द गेले आहेत, त्याची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही, याची मी काळजी घेईन," असे सांगत डॉक्टरांनी गावकऱ्यांची माफी मागितली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बुसान चित्रपट महोत्सवात सिक्कीमच्या त्रिवेणी गिता रायचा डंका; पटकावले दोन मोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी FDA मध्ये १० कोटींचा ‘सुपारी’ घोटाळा; फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार
- नाना पाटेकरांनी घरी मटण खाऊ घातलं अन् भांडीही घासायला लावली; परेश रावल यांनी सांगितला ‘त्या’ निर्मात्याचा किस्सा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








