प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: घरात उंदीर शिरला की सर्वांचीच तारांबळ उडते. फळे, टोमॅटो, कपडे यांबरोबरच पुठ्ठ्याचे बॉक्स आणि महत्त्वाचे सामान कुरतडून उंदीर मोठे नुकसान करतात. अनेकदा त्यांना मारण्याची आपली इच्छा नसते आणि नुसते हाकलून दिले तरी ते पुन्हा घरात येतातच. अशा वेळी काही सोप्या आणि घरगुती ट्रिक्सचा (Home Tips) वापर केल्यास उंदरांच्या या त्रासातून कायमची सुटका मिळवता येते.
उंदरांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी सर्वात आधी त्यांचे प्रवेशमार्ग बंद करणे गरजेचे आहे. खिडक्या, दरवाजे, भिंती, पाईप किंवा वेंटिलेशनच्या आसपास असलेल्या छोट्या फटी आणि छिद्रे तपासा. उंदीर अगदी बारीक जागेतूनही आत शिरू शकतात. त्यामुळे या सर्व जागा सिमेंटच्या साहाय्याने कायमच्या बुजवून घ्या. दरवाजाच्या खालून जागा उरत असल्यास तिथे डोअर स्वीपचा वापर करा.
उघड्या अन्नाचा वास उंदरांना वेगाने आकर्षित करतो. त्यामुळे स्वयंपाकघरातील ओट्यावर किंवा इतरत्र अन्नपदार्थ उघडे ठेवू नका. घरातील डाळी, तांदूळ, पीठ, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ नेहमी हवाबंद डब्यांमध्ये सुरक्षित ठेवा. अन्नापर्यंत पोहोचता न आल्यास उंदरांचा वावर कमी होण्यास मदत होते.
जुने वर्तमानपत्र, न वापरलेले कपडे, कार्डबोर्डचे बॉक्स आणि अडगळीचे सामान असलेल्या ठिकाणी उंदरांचा मुक्काम जास्त असतो. त्यामुळे घरात अशा वस्तू साठवून ठेवणे टाळा. उंदरांना पळवून लावण्यासाठी पेपरमिंट ऑईल हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. कापसाच्या बोळ्यावर या तेलाचे काही थेंब टाकून तो उंदरांच्या येण्याच्या मार्गावर ठेवा किंवा पाण्यात तेल मिसळून तिथे स्प्रे करा. या वासाने उंदीर घरात फिरकत नाहीत.
घराबाहेरील परिसरही स्वच्छ ठेवणे तितकेच आवश्यक आहे. बाल्कनी, बाग किंवा स्टोअर रूममध्ये लाकूड, सुकलेली पाने, जुने सामान आणि दाट झाडी वाढू देऊ नका. या जागा उंदरांसाठी लपण्याची सुरक्षित ठिकाणे बनतात, त्यामुळे वेळच्या वेळी त्यांची साफसफाई करा.








