पैठण | किरण काळे पाटील : मध्यरात्रीचा अंधार, गोदावरी नदीचं खोरं आणि वाळू माफियांची मुजोरी. हे समीकरण कधी थांबणार? हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. पैठण तालुक्यात वाळू माफियांनी (Sand Smuggling) चक्क पोलिसांच्याच डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. पण, खाकी वर्दीचा पाठलाग सुरू झाला अन् रस्त्यावरच थरार रंगला.
पैठण तालुक्यातील दादेगाव-चांगतपुरी फाट्यावर २५ ऑगस्टच्या मध्यरात्री हा फिल्मी स्टाईल थरार पाहायला मिळाला. गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळू ट्रॅक्टरने नेली जात असल्याची पक्की खबर पैठण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दादेगाव फाट्याजवळ सापळा रचला. रात्रीचे १२ वाजून ५१ मिनिटे झाले होते. समोरून चांगतपुरीकडून पैठणकडे एक ट्रॅक्टर येताना दिसला.
पोलिसांचा पाठलाग अन् वाळू रस्त्यावरच रिकामी
पोलिसांनी हात दाखवून ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला. चालकाने ट्रॅक्टर थांबवलाही. पण, पोलिसांनी वाळूबाबत विचारपूस सुरू करताच त्याची भंबेरी उडाली. चालकाने अचानक ट्रॅक्टर पुढे पळवला आणि चालत्या ट्रॅक्टरमधून वाळू खाली ओतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनीही पाठलाग करून त्याला अखेर ताब्यात घेतलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बाळासाहेब सोलाट (वय ३५, रा. दादेगाव, ता. पैठण) असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा निळ्या-पांढऱ्या रंगाचा ट्रॅक्टर (MH 20 FU 8469) आणि ५ हजारांची वाळू, असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पैठणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिरुद्ध पवार यांच्या फिर्यादीवरून खाण आणि खनिज अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) ३०३(२) कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण पुरी करत आहेत. आता यात आणखी कोणाचे हात बरबटलेत, हे लवकरच समोर येईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








