🕒 1 min read
मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळाली की अनेकजण पिकनिकचा प्लॅन करतात किंवा घरात आरामात लोळत पडतात. पण अशा ‘आळशी’ मतदारांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या कृतीतून सणसणीत चपराक लगावली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची रणधुमाळी सुरू असताना, नाना पाटेकरांनी जे केलंय, त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
लोकशाहीसाठी ३ तासांचा प्रवास नाना पाटेकर सध्या पुण्यात स्थायिक आहेत, पण त्यांचं नाव मुंबईच्या मतदार यादीत आहे. अंतराचं कारण न देता नाना पहाटे ६ वाजता पुण्यातून निघाले आणि तब्बल ३ तासांचा प्रवास करून मुंबईत पोहोचले. मतदान केल्यानंतर त्यांनी मुंबईकरांचे कान टोचले. ते म्हणाले, “मतदान करणं ही आपल्या अस्तित्त्वाची खूण आहे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला मत द्या, पण ही सुट्टी समजून घरात बसू नका. कृपया बाहेर पडा.” नानांच्या या एका वाक्याने सुट्टीची मजा घेणाऱ्यांना नक्कीच अंतर्मुख केलं असेल.
Nana Patekar Vote
एकीकडे नाना मुंबईत आले, तर दुसरीकडे अभिनेता सुबोध भावे खास मतदानासाठी मुंबईहून पुण्याला गेला. सुबोधनेही विकासाची नवी व्याख्या मांडली. “उंच इमारती म्हणजे विकास नव्हे. शहराने मोकळा श्वास घेतला पाहिजे,” असा टोला त्याने लगावला.
दुसरीकडे, हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही आपला हक्क बजावत मुंबईकरांना साद घातली. “मुंबईत चांगली हवा आणि खड्डेमुक्त रस्ते हवे असतील, तर घरात बसून चालणार नाही. ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.
आज सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांसारख्या दिग्गजांनी रांगेत उभं राहून मतदान केलं आहे. जर हे सेलिब्रिटी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढू शकतात, तर सामान्य नागरिक का नाही? असा सवाल आता उपस्थित होतोय. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, त्यामुळे नानांचं हे आवाहन ऐकून मतदानाचा टक्का वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ: ‘रोहित-विराटबद्दल आम्ही देवाकडे एकच प्रार्थना करतोय…’; न्यूझीलंडच्या खेळाडूची ‘ती’ कबुली चर्चेत!
- ‘भ्रष्ट माणसाच्या हातात सत्ता देऊ नका…’; मतदानाआधी तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट वादळ उठवणार!
- सोनू सूदने पुन्हा जिंकलं काळीज; गुजरातमधील गोशाळेसाठी दिली तब्बल २२ लाखांची देणगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












