Gungi Gudiya NCP Protest : काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर ‘गुंगी गुडिया’ अशी टीका करत जोरदार हल्ला चढवला होता. मात्र, या विधानामुळे आता काँग्रेसचीच कोंडी झाली असून, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या विधानाचे पडसाद नाशिक, पुणे आणि मुंबईसह संपूर्ण राज्यात उमटले असून विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
मुंबईत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत आज दुपारी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करत आहेत. आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी, संतप्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
Sunetra Pawar NCP protest over ‘Gungi Gudiya’ remark
जमा झालेले कार्यकर्ते आणि आंदोलक जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. ‘सुनेत्रा वहिनी आग है, बाकी सब भंगार है..’ ‘ गुंगी नहीं है , आँधी है.. आँधी नहीं तूफान आहे’, तसेच ‘ सुनेत्रा वहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा विविध घोषणांनी मंत्रालयाजवळचा परिसर दणाणून गेला होता.
“महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी येथे जमले आहेत. जोपर्यंत काँग्रेस माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही महात्मा गांधींच्या चरणी पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या सदस्यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करणार आहोत,” असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक याही उपस्थित होत्या आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “काँग्रेसने माफी मागितलीच पाहिजे. आमच्या पक्षातील कोणावरही टीका झाल्यास मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. काँग्रेसने जाहीर माफी मागावी, ही आमची मागणी आहे,” असे त्या म्हणाल्या. केवळ मूक आंदोलन करून महात्मा गांधींच्या पुतळ्याला शांततापूर्ण मार्गाने अभिवादन केले जाईल आणि कोणीही कायदा हातात घेणार नाही, असेही सना मलिक यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बुंदी आमच्या ताटात कधी पडेल ते पाहतोय’; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर राऊतांचे भाष्य
- Anil Deshmukh यांना मोठा झटका; 100 कोटी वसुली प्रकरणात आता थेट खटला चालणार!
- Eknath Shinde यांची नाराजी चर्चेत; शिवसेनेतील चार मंत्र्यांची खाती बदलणार?













