🕒 1 min read
मुंबई : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ (Maharashtra Epstein Files) या आगामी चित्रपटावरून राज्यातील राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांच्याविरोधात २५ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या वादानंतर आता चित्रपटाची टीम प्रथमच माध्यमांसमोर आली असून, दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचे स्पष्टीकरण
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी सांगितले की, हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असला तरी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव, ओळख किंवा वैयक्तिक जीवन यावर आधारित नाही. त्यांनी स्पष्ट केले की, कोणाचीही बदनामी किंवा मानहानी करण्याचा चित्रपटाचा उद्देश नाही. रुपाली चाकणकर यांनी पाठवलेल्या २५ कोटींच्या कायदेशीर नोटिशीला त्यांची कायदेशीर टीम उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले. सावंत यांनी पुढे सांगितले की, यापूर्वीही त्यांनी महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट तयार केले आहेत. हा चित्रपटही समाजात जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला असून, तो २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनीही पत्रकार परिषदेत नोटिशीवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आमच्यावर २५ कोटींचा दावा ठोकणाऱ्या व्यक्तीवर मला हसू येतं. हा चित्रपट कोणाच्याही जीवनावर आधारित नाही. यात कोणाचंही नाव वापरण्यात आलेलं नाही. महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.” दीपाली सय्यद यांनी पुढे प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “जर चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून इतके प्रयत्न केले जात असतील, तर त्यामागे नेमकं कारण काय? सिनेमाची इतकी भीती का वाटते?”
नेमका वाद कशावरून?
काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिलांचे शोषण केल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात काही राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर यांची भूमिका
रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाविरोधात तीव्र आक्षेप घेत निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिवंत व्यक्तीवर आधारित पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यासारखे पात्र दाखवून स्वतःची आणि कुटुंबाची बदनामी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत किंवा नोटिशीबाबत कोणताही अंतिम न्यायालयीन निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil-Vinod Tawde Meeting : राजकीय चर्चांना उधाण; महायुतीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची भूमिका काय?
- Teachers Protest : BLO ड्युटीतून मुक्ततेसाठी शिक्षकांचा एल्गार; ९ जुलैला राज्यभर आंदोलन
- Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री विजय यांना उच्च न्यायालयाची नोटीस; निवडणुकीला आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












