मुंबई, 12 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे (Maharashtra drought) पालेभाज्यांपाठोपाठ आता कडधान्य आणि तृणधान्यांच्या पेरणीलाही मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या पीक पेरणी अहवालानुसार, खरिपातील ज्वारी, बाजरी, मूग आणि उडीद या पिकांचे पेरणी क्षेत्र ६० टक्क्यांच्याही खाली आले आहे. पावसाने दिलेल्या खंडामुळे आगामी हंगामात या धान्यांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यामध्ये सरासरी १४४.३६ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. यावर्षी १४०.२६ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भाताची शंभर टक्के, तर मक्याची १३० टक्के पेरणी झाली असली, तरी इतर पिकांची स्थिती चिंताजनक आहे. खरिपातील ज्वारीचे क्षेत्र अवघे ३४ टक्क्यांवर आले आहे. तसेच बाजरी ५९ टक्के, मूग ५० टक्के आणि उडदाच्या पेरणीचे क्षेत्र केवळ ५६ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने केवळ पेरणी क्षेत्रच घटले नाही, तर प्रत्यक्ष उत्पादनातही मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे न भरणे, तसेच कापसाची पाती व फुले गळून पडण्याच्या समस्या समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.
उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाअभावी मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट होत असल्याचे पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनची पाने पिवळी पडून गळत असून, शेंगा चपट्या राहणे आणि त्यात दाणे न भरण्याच्या तक्रारी दिसून येत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी
- सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
- MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









