जळगाव, 12 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलाचे लग्न जमवण्यासाठी दलालाला अडीच लाख रुपये देऊन परराज्यातून आणलेल्या नवरीने अवघ्या तिसऱ्या दिवशी सासरच्या लोकांना जेवणातून विष दिले. यानंतर घरातील पैशांसह पसार झालेल्या नवरीला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी धुळे सीमेवरून काही तासांतच अटक केली आहे.
वेल्हाणे येथील ३२ वर्षीय वाल्मिक ताराचंद पाटील याच्या लग्नासाठी दलालाला अडीच लाखांची रक्कम देऊन झारखंड किंवा छत्तीसगडमधून मुली आणण्यात आल्या होत्या. यानुसार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी या तरुणीसोबत वाल्मिकचा गावातच विवाह पार पडला. मात्र, हा विवाह एक पूर्वनियोजित कट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या रात्री सुमन आणि तिची साथीदार आरती सूर्यप्रकाश पटेल यांनी संगनमत करून कट रचला. त्यांनी फिर्यादी गणेश पाटील, वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई पाटील यांच्या जेवणात उंदीर मारण्याचे विषारी औषध कालवले. कुटुंब बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर १० ऑक्टोबरच्या सकाळी या दोघींनी घरातील पैसे घेऊन गावातून पोबारा केला.
विषबाधेमुळे अत्यवस्थ झालेल्या ताराचंद पाटील आणि सरलाबाई पाटील यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल रुग्णालयात) उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, वेल्हाणेचे पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती तत्काळ पारोळा पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस हवालदार सुनील हाटकर, शिपाई गवळी आणि शिपाई शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित महिला धुळ्याच्या दिशेने पसार झाल्याचे समजताच पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाठलाग सुरू केला. धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पोलिसांनी दोन्ही महिलांना शिताफीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी गणेश ताराचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात सुमन सहाणी आणि आरती पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Jalgaon News) करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या दलालाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमरावती हादरलं! आई खोटं बोलत असल्याच्या संतापातून इंजिनिअर मुलाने घेतला जन्मदातीचा बळी
- इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी
- सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









