प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अंडर-१९ आशिया चषकाच्या अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला नमवत १ विकेटने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह संघाने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. ३३७ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना मोहित उल्वासोबतच मनल चौहान (Manal Chauhan) याने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
पाकिस्तानने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चढ-उताराची राहिली. आर्यावीर सेहवागने ५८, विके विनीथने २४, अर्जुन राजपूतने १६ आणि यशवर्धन चव्हाणने ९ धावा केल्या. लक्ष्य रायचंदानीने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो बाद झाल्यानंतर ३७ व्या षटकात मनल चौहान फलंदाजीला आला.
मनल मैदानावर असतानाच अन्वय द्रविड १९ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आर्यन सहानी ९ आणि काव्या पटेल शून्यावर तंबूत परतले. एका क्षणी भारताची अवस्था ८ बाद २५२ अशी बिकट झाली होती. इथून भारतीय संघ हा सामना जिंकेल असे कोणालाच वाटत नव्हते.
याच कठीण परिस्थितीत मनल चौहान आणि मोहित उल्वा यांनी डाव सावरत ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मनलने केलेल्या ४७ धावांच्या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्याने ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता.
मनल बाद झाल्यानंतर चिंगुरूपता वेंकटा मैदानावर आला. त्यावेळी भारताला १६ चेंडूंमध्ये २९ धावांची आवश्यकता होती. अशा अत्यंत दबावाच्या क्षणी मोहित उल्वाने अवघ्या २६ चेंडूंत ४९ धावांची वादळी खेळी केली. त्याला वेंकटाने ११ धावांची अनमोल साथ दिल्याने भारताने ५० षटकांत हे भलमोठं लक्ष्य यशस्वीपणे गाठले.
भारताच्या या विजयाचा पडद्यामागचा हिरो मनल चौहान आहे. १४ मार्च २००८ रोजी मध्य प्रदेशातील मुरैना येथे जन्मलेला मनल हा एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा फलंदाज असून स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजीही करतो. त्याने भारताच्या अंडर-१९ संघाचे आणि मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
देशांतर्गत वयोगट स्पर्धांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना त्याने ८५० पेक्षा जास्त धावा आणि ३७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. यापूर्वी जुलै २०२६ मध्ये श्रीलंका अंडर-१९ संघाविरुद्धच्या युवा कसोटी सामन्यातही त्याने आपली चमक दाखवली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात भारताने एकही धाव न काढता दोन विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी मैदानावर आलेल्या मनलने २४४ चेंडूंचा सामना करत १५० धावांची अत्यंत संयमी खेळी केली होती. त्याच्या याच कामगिरीमुळे भारताला सामन्यात पुनरागमन करून पहिल्या डावात ४११ धावांपर्यंत मजल मारता आली होती.
फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देण्याची क्षमता असल्यामुळे तो एक आश्वासक युवा खेळाडू मानला जातो. अंतिम सामन्यातील दबावाच्या परिस्थितीतही त्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अंडर-१९ आशिया कप विजयानंतर आर्यवीर सेहवागवर कौतुकाचा वर्षाव, वैभव सूर्यवंशीची खास पोस्ट
- पाकिस्तानविरुद्धच्या अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये भारताला विजय मिळवून देणारा गोलंदाज मोहित उलवा कोण आहे?
- शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज, मोहितचा खणखणीत चौकार; भारताने नवव्यांदा जिंकला अंडर-१९ आशिया कप







