प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवीर आर्यवीर सेहवागने आपले वडील वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखीच जिद्द दाखवून दिली आहे. भारत-पाकिस्तान फायनलमध्ये हाताला चेंडू लागून दुखापत झाली असतानाही त्याने मैदान सोडले नाही. वेदना होत असूनही तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने ६१ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत उस्मान खानच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावांचा मोठा टप्पा गाठला होता. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यवीरने कर्णधार लक्ष्य रायचंदानीसोबत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, डावाच्या पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आर्यवीरच्या हाताला जोराने चेंडू लागला आणि तो वेदनेने विव्हळू लागला. फिजिओने उपचार केल्यानंतर त्याच्या वेदना थोड्या कमी झाल्या.
दुखापतीनंतर फटकेबाजी करताना त्याला अडचण येत होती. यामुळे तो नेहमीपेक्षा थोडा संथ खेळला. तरीही हार न मानता त्याने १५ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. ५१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्यानंतर तो क्रीझवर जास्त वेळ थांबू शकला नाही आणि ५८ धावांवर बाद झाला.
आर्यवीर सेहवाग या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ५ सामन्यांत ९०.२५ च्या सरासरीने एकूण ३६१ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याने चौथ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने नेपाळविरुद्ध ७०, यूएईविरुद्ध १६० आणि अफगाणिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीत ५१ धावांची खेळी केली होती.
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा उस्मान खान दुसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी झालेल्या फायनलमध्ये भारताविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या उस्मानने पाच सामन्यांत एकूण ३४५ धावा केल्या आहेत, ज्यात स्पर्धेतील त्याच्या दोन शतकांचा समावेश आहे. या यादीत बांगलादेशचा मुमीन तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ४ सामन्यांत २३५ धावा केल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK : १६ चेंडूत २९ धावांची गरज, ९ विकेट पडल्यानंतर १० व्या नंबरच्या बॅटरने मिळवून दिला थरारक विजय
- मोहित उलवाचा विजयी चौकार! U19 आशिया कप फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय, चाहत्यांचा जल्लोष
- पुणे: जावयाची हत्या करून सासरच्यांचा अपघाताचा बनाव; पोलिसांच्या तपासात भांडाफोड








