प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १ विकेट राखून ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले ३४० धावांचे महाकाय आव्हान पार करत टीम इंडियाने विक्रमी दहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पराभवाच्या उंबरठ्यावरून भारताने हे अविश्वसनीय पुनरागमन केले.
या सामन्यात पाकिस्तानच्या ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची चांगलीच पडझड झाली होती. एकापाठोपाठ विकेट्स गेल्याने सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला दिसत होता. अखेरच्या षटकात भारताचे ९ गडी बाद झाले होते आणि विजयासाठी ६ चेंडूंत ८ धावांची आवश्यकता होती. अशा निर्णायक क्षणी मैदानावर मोहित उल्वा आणि चिगुरुपती वेंकटा ही शेवटची जोडी उरली होती.
शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी पाकिस्तानच्या अहमद हुसेनकडे होती. पहिल्याच चेंडूवर मोहितला मोठा फटका मारता आला नाही. मात्र, पुढचा चेंडू वाईड गेल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर मोहित आणि चिगुरुपती यांनी एकेरी धावा काढल्याने सामन्यातील उत्कंठा अधिकच वाढली आणि हा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला.
विजयासाठी अंतिम चेंडूवर ३ धावांची गरज असताना अहमद हुसेनच्या चेंडूवर मोहित उल्वाने पुढे सरसावत ‘लॉन्ग-ऑफ’च्या दिशेने शानदार चौकार लगावला. हा विजयी चौकार सीमारेषेपलीकडे जाताच भारतीय खेळाडूंनी तिरंगा हातात घेत मैदानावर धाव घेतली आणि विजयाचा जल्लोष सुरू केला. दबावाच्या क्षणी संयम आणि धाडस दाखवणारा मोहित भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला.
या संस्मरणीय विजयासह भारताने पाकिस्तानचा दुहेरी हिशेब चुकता केला आहे. मागील अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात, तसेच यंदाच्या स्पर्धेतील साखळी फेरीतही पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. मात्र, अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत भारतीय संघाने या दोन्ही पराभवांचा सव्याज बदला घेतला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोहित उलवाचा विजयी चौकार! U19 आशिया कप फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय, चाहत्यांचा जल्लोष
- पुणे: जावयाची हत्या करून सासरच्यांचा अपघाताचा बनाव; पोलिसांच्या तपासात भांडाफोड
- हैदराबाद क्रिकेटला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी अंबाती रायुडूंचे मोठे प्रयत्न; स्वतःचा ट्रॅक्टर आणून सुधारली मैदानाची स्थिती








