मुंबई, 22 नोव्हेंबर: पचनक्रिया सुधारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुपाचा उपयोग त्वचेच्या आरोग्यासाठीही केला जातो. विशेषतः हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुपापासून घरीच नैसर्गिक मॉईश्चरायझर बनवणे शक्य आहे.
हिवाळ्यात गरम पाण्याचा वाढता वापर आणि गार हवेमुळे तहान कमी लागणे, याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडून तिला भेगा दिसू लागतात. अशा वेळी घरोघरी सहज उपलब्ध असणारा तुपाचा उपाय फायदेशीर ठरतो. ओठ कोरडे पडल्यास त्यावर तूप लावल्याने त्याचा ओशटपणा बराच काळ टिकून राहतो.
तुपापासून मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी दोन चमचे देशी तूप, एक चमचा थंड पाणी, एक ताट आणि एक लहान वाटी इतके साहित्य लागते. हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे तूप घेऊन त्यात दोन थेंब थंड पाणी घालावे. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण फेटून घ्यावे. फेटल्यामुळे त्याची क्रीमी पेस्ट तयार होऊन पाणी वेगळे होऊ लागते. हे मिश्रण योग्य प्रकारे तयार झाले आहे का, हे तपासण्यासाठी भांडं उलटं करून पाहावे. जर मिश्रण बाहेर पडले, तर ते आणखी थोडा वेळ फेटावे. हे घरगुती नैसर्गिक क्रीम काचेच्या बाटलीत भरून रोज रात्री झोपण्यापूर्वी लावावे. यामुळे सकाळी हात आणि पाय मऊ आणि उत्तम प्रकारे मॉइश्चराइज झालेले जाणवतील.
याव्यतिरिक्त, कोरफड आणि तुपाचा एकत्र वापर करूनही मॉइश्चरायझर बनवता येते. यासाठी दोन चमचे देशी तूप, एक चमचा कोरफडीचा गर, बदामाच्या तेलाचे काही थेंब आणि व्हिटॅमिन ईचं एक कॅप्सूल लागते. हे सर्व घटक एका भांड्यात घेऊन व्यवस्थित फेटून घ्यावेत. मिश्रण थोडे क्रीमी झाल्यावर ते एका बाटलीत भरून ठेवावे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण त्वचेवर लावल्यास काही दिवसांतच त्वचा बरी होऊन मऊ होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा
- ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकी अहवालातून धक्कादायक माहिती उघड
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉचा हवेत झेपावत अफलातून झेल







