प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: चेहऱ्याची काळजी घेताना अनेकदा आपल्या हाता-पायांकडे दुर्लक्ष होते. सततचा सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे हाता-पायांची त्वचा काळी पडते तसेच मृत त्वचेचा थर जमा होऊन ती कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशा वेळी प्रत्येक वेळी पेडिक्युअरसाठी पार्लरमध्ये जाणे शक्य नसते. परंतु, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हाता-पायांची स्वच्छता राखता येऊ शकते.
यासाठी सर्वात आधी एका टबमध्ये कोमट पाणी घ्यावे. त्यात २ चमचे साखर, १ चमचा लिक्विड क्लीन्सर किंवा सर्फॅक्टंट, १ चमचा एरंडेल तेल आणि एका लिंबाचा रस मिसळावा. या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. यामुळे त्वचा मऊ होते आणि साचलेली घाण व मृत त्वचा निघण्यास मदत होते.
पाय कोमट पाण्यात भिजवल्यानंतर स्क्रब तयार करून घ्यावा. एका भांड्यात २ चमचे बेसन, २ चमचे साखर, अर्धा ते एक चमचा कॉफी पावडर, १ चमचा मध आणि थोडे दूध टाकून याची घट्ट पेस्ट बनवावी. हा तयार केलेला स्क्रब हाता-पायांना लावून, उरलेल्या लिंबाच्या सालीने त्यावर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा.
या स्क्रबिंगमुळे मृत त्वचा सहजपणे निघून जाते आणि पाय अधिक स्वच्छ दिसू लागतात. जर तुमच्या हाता-पायांवर खूप जास्त काळपटपणा किंवा मृत त्वचा साचली असेल, तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा करू शकता. या नियमित काळजीमुळे हाता-पायांची त्वचा स्वच्छ, मऊ आणि निरोगी राहते.
📌 महत्वाच्या बातम्या
- महिलेवर अत्याचार आणि १९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला थेट दुबईतून अटक
- १९ वर्षीय युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं; ग्राहक आयोगाचा १५ हजारांचा दंड
- अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा








