पुणे, 21 नोव्हेंबर: महाराष्ट्रात दुष्काळामुळे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ‘फुले यशोमती’ या ज्वारीच्या वाणाचे मोफत बियाणे देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रासाठी हे बियाणे पुरवण्यात आले असून, बहुतांश ठिकाणी याची पेरणीही पूर्ण झाली आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामात विहीर, तलाव, कालवा किंवा बोअरवेलचे पाणी उपलब्ध असल्यास तिथे ज्वारीची पेरणी करावी. या पिकाला दोन ते तीन वेळा संरक्षित पाणी दिल्यास धान्यासोबतच जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होऊ शकतो, ज्यामुळे चारा टंचाई कमी होण्यास मदत होईल. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आणखी १० हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारीचे मोफत बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याचे वितरण केले जाणार असून, पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात हरभरा पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. हे पीक कमी पाण्यात येत असल्याने यंदा शेतकरी हरभरा लागवडीला पसंती देत आहेत. उसाची तोडणी झाल्यानंतर आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडण्याची शक्यता असलेल्या शेतात उसाचा खोडवा न ठेवता हरभरा घेतल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत मिळते. यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ३२० एकर क्षेत्रासाठी हरभरा बियाण्याचे मोफत वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रमाणित बियाणे’ या ऐवजी ‘मिनी किट’ या घटकांतर्गत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध १३६ धावांच्या खेळीनंतर दिनेश कार्तिककडून केएल राहुलचे कौतुक; दिग्गज सलामीवीरांच्या पंक्तीत दिले स्थान
- सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी; बॉक्स ऑफिसवरील क्लॅश ठरले कारण
- लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय संघर्ष; अमित देशमुख आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप








