प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: लातूरच्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याच्या तत्कालीन घटनेला राजकीय षडयंत्र म्हटले आहे. यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार करत, काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्ताकाळात हा प्रश्न का सुटला नाही, अशी विचारणा केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लातूरचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही, असे भासवण्यासाठीच रेल्वेने पाणी आणण्याचा अपप्रचार करण्यात आल्याचा दावा अमित देशमुख यांनी केला. तसेच, सध्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने आता त्यांनी रेल्वेने पाणी आणण्याची मागणी करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
देशमुखांच्या या विधानानंतर भाजपने तातडीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत होती, लातूर महापालिकेतही त्यांचेच वर्चस्व होते आणि स्वतः अमित देशमुख अनेक वर्षांपासून लातूरचे नेतृत्व करत आहेत, तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केला. आजही लातूरमध्ये जवळपास महिन्याभराने पाणी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याचबरोबर, अमित देशमुख यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आगामी पंचवार्षिक योजनेत लातूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून दाखवावा, असे थेट आव्हान नवनाथ बन यांनी दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी मॅथ्यू हेडनचा पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन संघाला ‘सँडपेपर गेट’वरून इशारा
- सँडपेपरगेटचे नवे दावे: क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सला कसोटी कर्णधार म्हणून पूर्ण पाठिंबा
- न्यूझीलंडविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्या चारही फलंदाजांची अर्धशतके








