प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: ‘सँडपेपरगेट’ प्रकरणाच्या नव्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) पॅट कमिन्सला कसोटी कर्णधार म्हणून आपला एकमताने पाठिंबा दर्शवला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर मंडळाने स्पष्ट केले की, पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ३३ वर्षीय कमिन्सच ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल.
२०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील चेंडूशी छेडछाड प्रकरणी कमिन्सला पूर्वकल्पना होती, असे दावे माजी सहकाऱ्यांनी नुकतेच केले आहेत. या दौऱ्यात कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला सँडपेपर वापरताना पकडण्यात आले होते. याप्रकरणी बॅनक्रॉफ्टला ९ महिन्यांची, तर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला १२ महिन्यांची बंदी भोगावी लागली होती. नव्या दाव्यांमुळे या योजनेची माहिती नेमकी कोणाला होती, यावरील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतर, मंडळाचे अध्यक्ष डेव्हिड बून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी सिडनी येथे पॅट कमिन्सची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कमिन्सचे हित, संघाला आवश्यक असलेला पाठिंबा आणि आगामी न्यूझीलंड मालिकेवर चर्चा केली.
याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा आणि सर्वांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मंडळाची बैठक पार पडली. कमिन्सच्या पदाबाबत सुरू असलेल्या चर्चा पाहता, त्याला कर्णधार म्हणून एकमताने पाठिंबा देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.”
नव्या वादातून ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मार्ग दाखवण्याची मंडळाची इच्छा असल्याचे अध्यक्ष डेव्हिड बून यांनी सांगितले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला त्यांचे अनुभव मांडण्याची संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले. “याच उद्देशाने आम्ही या आठवड्यात स्वतंत्र मंचाची (independent forum) स्थापना केली आहे. आम्ही लवकरच या मंचाच्या कार्यकक्षा (Terms of Reference) प्रकाशित करू,” असे बून यांनी स्पष्ट केले.
“आम्ही पॅटला आमचा पाठिंबा व्यक्त केला असून २०१८ च्या दौऱ्यातील घटनांचा फटका बसलेल्या सर्वांबद्दल आम्हाला काळजी आहे. आम्ही त्या अनुभवातून धडा घेतला असून गेल्या आठ वर्षांत पॅट आणि इतर नेत्यांनी संघात रुजवलेल्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. पॅटच्या सचोटीवर शंका घेणारा कोणताही दावा आम्ही स्पष्टपणे फेटाळतो,” असेही बून यांनी सांगितले.
सिडनी येथील भेटीनंतर कमिन्सने डेव्हिड बून आणि टॉड ग्रीनबर्ग यांचे आभार मानले. तो म्हणाला, “डेव्हिड आणि टॉड यांच्याशी बोलणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार असणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी ती कधीही हलक्यात घेणार नाही. २०१८ मधील खेळाडू आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.”
कमिन्सने या स्वतंत्र मंचालाही आपला पाठिंबा दर्शवला असून, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी असलेल्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आपण स्वतः तिथे उपस्थित राहणार असल्याचे त्याने निश्चित केले. “पुढे अनेक कठीण संवाद होतील, पण सध्या त्याचीच गरज आहे. मात्र, इथून पुढे पर्थ येथे होणाऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणे हेच माझे मुख्य लक्ष्य आणि प्राधान्य असेल,” असे कमिन्सने स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या प्रशासनात मोठे बदल होणार? नव्या मुख्य सचिवपदासाठी ३ नावांची जोरदार चर्चा
- यशस्वी जैस्वालला ट्रेड करण्यासाठी ४ फ्रँचायझींमध्ये चुरस; राजस्थान रॉयल्सकडून चाचपणी सुरू
- पहिल्या कसोटीत जाडेजाऐवजी वॉशिंग्टन सुंदरला पसंती; सुनील गावसकर यांनी उपस्थित केले प्रश्न








