प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून रवींद्र जाडेजाला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याच्या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुंदरने अलीकडे जास्त सामने न खेळल्यामुळे तो लयीत (rusty) नसावा, अशी टीका गावसकर यांनी केली आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच भारताचा कर्णधार शुभमन गिल याने स्पष्ट केले होते की, वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथील खेळपट्टीवर संघ चार विशेषज्ञ वेगवान गोलंदाज आणि केवळ एका फिरकीपटूसह मैदानात उतरेल. न्यूझीलंडच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज असल्याने, वॉशिंग्टन सुंदरच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली.
सुनील गावसकर म्हणाले, “जर तुम्ही जाडेजाला खेळवणारच नव्हता, तर त्याला न्यूझीलंडला का आणले? त्याचा अनुभव आणि गोलंदाजीतून मिळणारा वेगळा अँगल पाहता, हा निर्णय समजणे खूप कठीण आहे.”
“न्यूझीलंडच्या फलंदाजी फळीत डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम आणि रचिन रवींद्र यांसारखे अनेक डावखुरे फलंदाज आहेत. जाडेजापेक्षा सुंदरला पसंती देण्यामागे मला हे एकमेव कारण दिसत आहे,” असे गावसकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “सुंदरने अलीकडे फारसे क्रिकेट खेळलेले नाही. तो वनडे किंवा टी-२० सामन्यांमध्येही खेळलेला नाही, त्यामुळे तो गोलंदाजीत थोडा रस्टी वाटू शकतो. भारतीय क्रिकेटसाठी खूप योगदान दिलेल्या दोन वरिष्ठ खेळाडूंवर हा थोडा अन्याय आहे. पण मला आशा आहे की हा निर्णय भारतासाठी यशस्वी ठरेल.”
‘सेना’ (SENA) देशांमधील भारताच्या मागील रेड-बॉल क्रिकेट दौऱ्यात रवींद्र जाडेजाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, तरीही त्याला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २०२५ च्या ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने १० डावांमध्ये ८६.०० च्या सरासरीने ५१६ धावा कुटल्या होत्या, ज्यात एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.
मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटीत जाडेजाने नाबाद १०७ धावांची खेळी करत भारताचा पराभव टाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. एका कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेल्या ५१६ धावा या सर्वाधिक आहेत. तसेच त्याने ३.५६ च्या इकॉनॉमी रेटने सात विकेट्सही मिळवल्या होत्या.
तरीही, टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र या न्यूझीलंडच्या डावखुऱ्या फलंदाजांना लक्ष्य करण्यासाठी भारताने सुंदरला पसंती दिली. सुंदरसोबत चार विशेषज्ञ वेगवान गोलंदाज खेळवण्याच्या निर्णयामुळे मोहम्मद सिराजलाही संघाबाहेर बसावे लागले आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी, कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या सत्रात भारताने वर्चस्व राखले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद केले. त्यानंतर अंशुल कंबोजने कॉनवेला ४ धावांवर माघारी धाडले. रचिन रवींद्र आणि हेन्री निकोल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. मात्र, आकाश दीप याने रचिनला (५० चेंडूंत १५ धावा) बाद करत ही जोडी फोडली.
बुमराहने डॅरिल मिशेलला १ धावेवर बाद करत आपला दुसरा बळी मिळवला. त्याचा झेल शॉर्ट लेगवर यशस्वी जैस्वालने पकडला. टॉम ब्लंडेललाही मोठी खेळी करता आली नाही आणि न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ७० अशी झाली.
मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्सने सकारात्मक दृष्टिकोनाने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. फिलिप्स आणि हेन्री निकोल्स या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद १७३ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली होती. हेन्री निकोल्सने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १२वे आणि बेसिन रिझर्व्हवरील ५वे शतक झळकावले, तर ग्लेन फिलिप्स ९४ धावांवर नाबाद राहिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉ. रुचिका शर्मांचे वादग्रस्त दावे; ‘९० टक्के युद्धे मराठ्यांविरुद्ध’
- ‘इस्लाई फाउंडेशन’ ते ‘शहाजी पाटील’ फेक अकाउंट; पैगंबर शेख यांच्यावर बदनामीचे आरोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप
- ४००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणार! ‘रामायण’ चित्रपटाबाबत अभिनेत्री लारा दत्ताचा मोठा दावा








