पुणे, 31 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे. मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत बैठक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही राजकीय चर्चा किंवा बैठक झालेली नाही, त्यामुळे यातून कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढू नये.
मुंबईत राज्यातील १०० वर्षांतील ७५ व्यंगचित्रकारांवर आधारित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आपण केवळ एक साहित्यप्रेमी म्हणून उपस्थित होतो, असे फडणवीस म्हणाले. माध्यमांमधील चर्चांवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, मंचावर जाण्यापूर्वी सर्व नेते आणि काही व्यंगचित्रकार एकत्र वेटिंग रूममध्ये बसलो होतो. वेळ झाल्यावर सर्वजण एकत्रच मंचावर गेलो. तिथे झालेली भाषणे अतिशय हलकीफुलकी आणि हास्यविनोद फुलवणारी होती. वैचारिक मतभेद आणि राजकीय टीकाटिप्पणी असली तरी, अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येणे हीच महाराष्ट्राची संस्कृती असून जनतेलाही असे कार्यक्रम आवडतात, अशी भावना त्यांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केली.
याच वेळी फडणवीस यांनी राज्यातील इलेक्ट्रिक बसेसच्या धोरणावरही भाष्य केले. ग्रीन मोबिलिटीला राज्याचे प्राधान्य असून, पुढील तीन ते चार वर्षांत एकट्या महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिका १० हजार, तर एसटी महामंडळ ३० हजार बसेस खरेदी करू इच्छिते. याशिवाय पुणे आणि नागपूरमध्येही ई-बसेसची आवश्यकता आहे. मात्र, सध्या त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्याचे ते म्हणाले. ‘पिनॅकल’च्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना त्यांनी कंपनीला उत्पादनक्षमता वाढवण्याच्या सूचना दिल्या. ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत बसेस उपलब्ध झाल्यास त्या अधिक सोयीच्या ठरतील आणि राज्यात तयार होणाऱ्या ई-व्हेईकल इकोसिस्टीमचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







