प्रतिनिधी, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज चॅड सायर्स यांनी २०१८ च्या वादग्रस्त सँडपेपर (चेंडूशी छेडछाड) प्रकरणावर अखेर मौन सोडले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याला आठ वर्षे उलटून गेल्यानंतर, सायर्स यांनी पोर्ट एलिझाबेथ आणि केपटाऊन कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये नेमके काय घडले, याबाबत नवी माहिती दिली आहे. सँडपेपर वापरण्याची कल्पना संपूर्ण संघाला होती, असा दावा त्यांनी केला असून या प्रकरणात आपला स्वतःचा सहभागही उघड केला आहे.
डेव्हिड वॉर्नर हा या योजनेत सहभागी होण्यास तयार नव्हता, कारण त्याची प्रतिमा आधीच ‘बॅड बॉय’ अशी होती आणि कॅमेरे त्याच्यावरच असतील, हे त्याला माहीत होते. त्यामुळे कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने सँडपेपर वापरण्याची जबाबदारी घेतली, असे सायर्स यांनी सांगितले. सुरुवातीच्या योजनेनुसार, बॅनक्रॉफ्टने सँडपेपर मैदानात नेऊन पंचांच्या जवळ टाकणे आणि खेळ सुरू ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पोर्ट एलिझाबेथ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतरच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान यात अनपेक्षित वळण आले.
त्यावेळी १२वा खेळाडू म्हणून मैदानात पाणी घेऊन गेलेल्या सायर्सकडे बॅनक्रॉफ्टने ते सँडपेपर दिले. सायर्सने ते तिथून लपवून नेले. त्यानंतर आपण त्याचे काय केले हे स्पष्टपणे आठवत नसले तरी, त्या कसोटीत सँडपेपरचा पुन्हा वापर झाला नसावा, असे सायर्सला वाटते. ‘एसईएन’शी बोलताना ते म्हणाले की, “माध्यमांनी मला उस्मान ख्वाजाची बाजू घेणारा ठरवले, कारण मी सत्य स्वीकारून बोललो. पण मला खात्री आहे की त्या संघातील प्रत्येकाला काय सुरू आहे आणि काय वापरले जात आहे, याची माहिती होती.”
केपटाऊन कसोटीबाबत ते म्हणाले, “पहिल्या डावात सँडपेपरचा वापर झाला की नाही, यावर मी १०० टक्के ठाम नाही. पण दुसऱ्या डावात तो नक्कीच वापरला गेला.” केपटाऊनच्या घटनेनंतर संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये ६० ते ९० मिनिटे एकत्र बसला होता आणि पुढे काय करायचे, यावर चर्चा झाली. यावेळी दोन खेळाडूंनी सामूहिक जबाबदारी घेण्यास विरोध केला होता, मात्र सायर्स यांनी त्यांची नावे उघड करण्यास नकार दिला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या तपासात सायर्स यांची कधीही चौकशी झाली नाही. खेळाडूंना मुलाखतीसाठी हॉटेलजवळ थांबण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी सायर्स यांची पत्नीही दक्षिण आफ्रिकेत होती, तरीही त्यांना कुणीही प्रश्न विचारले नाहीत. “कदाचित आम्ही १२वे खेळाडू होतो म्हणून किंवा आम्हाला खूप जास्त माहिती होती म्हणून आमची चौकशी झाली नाही, मला नक्की माहीत नाही,” असे सायर्स म्हणाले.
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन या प्रमुख गोलंदाजांना याबाबत काहीच माहिती नव्हती का, असे विचारले असता, सायर्स यांनी सर्वांना याची कल्पना असल्याचा दावा केला. चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी प्रत्येकाचा त्यात सहभाग असणे आवश्यक असते, असे ते म्हणाले. याशिवाय, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजावर केलेल्या वैयक्तिक टिप्पण्यांवरून सायर्सने नाराजी व्यक्त केली.
कमिन्सचे बोलणे आपल्याला विचित्र वाटले असून आपण ते फारसे पाहिले नाही, असे ते म्हणाले. डेव्हिड वॉर्नरनेही नुकतीच आपली मते मांडली आहेत, याचा संदर्भ देत सायर्स म्हणाले की, जोपर्यंत सर्वजण खऱ्या घटनेवर एकमत होत नाहीत, तोपर्यंत हा वाद मिटणार नाही आणि लोकांच्या मनात या प्रकरणाबाबत कुतूहल कायम राहील.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK : पाकिस्तानचा जल्लोष सुरू असताना त्याने मॅच फिरवली; भारताला जिंकून देणारा मनल चौहान कोण आहे?
- अंडर-१९ आशिया कप विजयानंतर आर्यवीर सेहवागवर कौतुकाचा वर्षाव, वैभव सूर्यवंशीची खास पोस्ट
- पाकिस्तानविरुद्धच्या अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये भारताला विजय मिळवून देणारा गोलंदाज मोहित उलवा कोण आहे?








