बांगलादेश क्रिकेटमध्ये व्हॅसलीनचा वापर करून चेंडूशी छेडछाड; देशांतर्गत स्पर्धेत गंभीर आरोप

बांगलादेशातील नॅशनल क्रिकेट लीग सेकंड इलेव्हन स्पर्धेदरम्यान चेंडूशी छेडछाड झाल्याचा आरोप आहे. रिव्हर्स स्विंगसाठी खेळाडूंनी व्हॅसलीनचा वापर केल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.

Published On: 

Ball tampering allegations in Bangladesh cricket using vaseline.

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: बांगलादेशच्या पहिल्यावहिल्या नॅशनल क्रिकेट लीग (NCL) सेकंड इलेव्हन स्पर्धेत चेंडूशी छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी खेळाडूंनी व्हॅसलीनचा वापर केल्याचा आरोप एका अधिकाऱ्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ढाका विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर खुलना विभागाच्या खेळाडूंवर हा गंभीर आरोप केला. खेळाडू आपल्या बोटांच्या मध्ये वासाविना असलेले (unflavoured) व्हॅसलीन लपवून ठेवतात आणि चेंडू हाताळताना ते त्याला लावतात, ज्यामुळे पंचांना हा प्रकार ओळखणे कठीण जाते, असा दावा त्यांनी केला आहे.

या अधिकाऱ्याने सांगितले की, “होय, खेळाडू चेंडूशी छेडछाड करण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करतात. बोटांच्या मध्ये व्हॅसलीन लावले जात असल्याने हे कुणी केले, हे शोधणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे चेंडू जड होतो आणि हवेत योग्य प्रकारे स्विंग न होता तो रिव्हर्स होतो. तसेच चेंडू स्किड होण्यासही याची मदत होते.”

खुलना संघावर थेट आरोप करताना या अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “हे शोधणे खरोखरच कठीण आहे. कदाचित तुम्हाला प्रत्येकावर कॅमेरा लावावा लागेल. खुलना संघाचे खेळाडू मोठ्या प्रमाणावर हे करत होते. ते केसांना व्हॅसलीन लावून चेंडूवर घासत होते. तसेच हातातही व्हॅसलीन लावून चेंडू पकडताना त्याचा वापर करत होते. आम्ही पंचांना अनेकदा सांगितले, पण वासाविना व्हॅसलीन असल्याने त्याचा कोणताही वास येत नाही आणि ते शोधणे अशक्य होते.”

स्पर्धेशी संबंधित अनेक व्यक्तींच्या मते, सामन्यादरम्यान मौखिक तक्रारी करूनही पंचांनी कोणतीही कारवाई केली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हॅसलीनचा वापर आता वाढत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) पंच समितीला यासंदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.

कोणतीही अधिकृत तक्रार नसल्यामुळे आतापर्यंत कोणत्याही खेळाडू किंवा संघाविरुद्ध चौकशी किंवा शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. बीसीबीनेही या प्रकरणाच्या पुनरावलोकनाबाबत कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. ही गैरप्रथा वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्येही पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान पूर्वचल येथील नॅशनल क्रिकेट ग्राउंडवर पार पडली. या तीन दिवसीय अंतिम सामन्यात ढाका विभाग सेकंड इलेव्हनने खुलना विभाग सेकंड इलेव्हनवर एक डाव आणि ३५ धावांनी शानदार विजय मिळवत पहिले जेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात खुलनाचा पहिला डाव १३७ धावांत आटोपला. त्यांच्याकडून सियाम हुसेन दिपूने ११४ चेंडूत सर्वाधिक ५९ धावा केल्या, तर कायेस रहमान लबीब ३६ धावांवर नाबाद राहिला. ढाकाच्या इयासिन हुसेनने ४७ धावांत ५ आणि मारुफ मृधाने १० धावांत २ बळी घेतले.

याला प्रत्युत्तर देताना ढाकाने अहरार अमीन पीयनच्या १५९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला डाव ८ बाद ३२४ धावांवर घोषित करत मोठी आघाडी घेतली. या डावात खुलनाच्या रब्बीउल इस्लाम रॉबीने १२१ धावा देत ५ बळी घेतले.

खुलनाचा दुसरा डावही केवळ १५२ धावांत संपुष्टात आला. जवाद रोयेनने ७६ धावा करत एकाकी झुंज दिली, मात्र ढाकाच्या गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व राखले. दुसऱ्या डावात ढाकाच्या इयासिनने ४७ धावांत ३, अहरार अमीनने २५ धावांत ३ आणि सियाम हुसेनने १९ धावांत ३ बळी मिळवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही