Johannesburg, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने ‘सँडपेपर गेट’ प्रकरणावरून केलेल्या नव्या दाव्यांमुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या वादावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने प्रतिक्रिया दिली असून, क्रिकेटच्या इतिहासातील या काळ्या अध्यायाशी आणि ऑस्ट्रेलियन वादाशी आपल्या संघाचा काहीही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
उस्मान ख्वाजाचे ‘सब्र’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यापूर्वी त्याने असा दावा केला आहे की, चेंडूशी छेडछाड (सँडपेपर गेट) प्रकरणाची ऑस्ट्रेलियन संघातील सर्व खेळाडूंना पूर्वकल्पना होती. मात्र, केवळ तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीनच खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, असा प्रकार पहिल्यांदाच घडला नव्हता, असेही ख्वाजाने सुचवले आहे.
शुक्रवारी जोहान्सबर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रबाडाला ऑस्ट्रेलियातील या सद्यस्थितीबाबत आणि त्याच्या मताबद्दल विचारण्यात आले. क्रिकबझच्या वृत्तानुसार रबाडा म्हणाला, “त्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही. हा आमचा विषय नाही. तो पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचा विषय आहे. यात आम्ही कुठेही सामील आहोत असे मला वाटत नाही.”
२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत रबाडाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या मालिकेत १९.२६ च्या सरासरीने २३ गडी बाद केले. त्यानंतर आठ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला होता. पहिला सामना गमावूनही दक्षिण आफ्रिकेने ती मालिका २-१ ने जिंकून वर्चस्व गाजवले होते. या मालिकेतही रबाडाने २४.७० च्या सरासरीने १० विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सँडपेपर गेट व्यतिरिक्त रबाडाला जगातील नंबर १ कसोटी संघ बनल्याच्या भावनांबद्दलही विचारण्यात आले. तो म्हणाला, “जगातील नंबर १ संघ बनणे खूप छान वाटते. सर्व चढ-उतारांनंतरही हार न मानता बॅजसाठी (देशासाठी) खेळत राहण्याचे हे फळ आहे. हा प्रवास नेहमीच सोपा नसतो.”
चाहत्यांच्या प्रतिसादावर बोलताना त्याने आश्चर्य व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, “चाहत्यांच्या या प्रतिसादाने मी खूप आनंदी आहे. लोकांना यात इतका रस आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. आम्ही लोकांचे मनोरंजन करू शकतो ही गोष्ट मला आवडते; आणि शेवटी आम्ही तेच करत असतो.”
📌 महत्वाच्या बातम्या
- आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! ११२ आजारांवरील उपचार केवळ सरकारी रुग्णालयांतच होणार?
- वाऱ्याची दिशा बदलल्याने महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल; जाणून घ्या IMD चा नवा अंदाज
- प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा धोका वाढला; २०२७ च्या सुरुवातीला भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होणार?








यूट्यूब वॉचअलॉन्ग शोवरून ईसीबीचा दिग्गज समालोचकांना ॲशेस मालिकेत बंदीचा इशारा