🕒 1 min read
काबुल/मुंबई : भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या T20 वर्ल्डकप २०२६ (T20 World Cup 2026) साठी अफगाणिस्तानने आपले रणशिंग फुंकले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ३० डिसेंबर रोजी आपली १५ शिलेदारांची फौज जाहीर केली असून, संघाची धुरा पुन्हा एकदा स्टार लेग-स्पिनर राशीद खान (Rashid Khan) याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संघात दुखापती आणि विश्रांतीमुळे बाहेर असलेल्या चार प्रमुख ‘मॅच विनर’ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
संघात सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) याची वापसी. आशिया कपदरम्यान खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते, मात्र आता तो पूर्णपणे फिट होऊन परतला आहे. त्याच्या जोडीला अनुभवी अष्टपैलू गुलबदिन नायब आणि डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी हे देखील संघात परतले आहेत. बोर्डाने फिरकी आक्रमणाला धार देण्यासाठी ‘मिस्ट्री स्पिनर’ मुजीब उर रहमानला पुन्हा संधी दिली आहे.
Afghanistan Team for T20 WC 2026
मागील २०२४ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गजांना लोळवत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, यंदाचा प्रवास खडतर असणार आहे. अफगाणिस्तानचा समावेश ‘ग्रुप डी’मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारखे तगडे संघ आहेत. ८ फेब्रुवारीला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून १९ जानेवारीपासून अफगाण संघ यूएईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. आशियाई खेळपट्ट्यांवर राशीद खानची फिरकी आणि नवीन-उल-हकचा वेग प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरात राडा! “गाढवावरून धिंड काढू”; अंबादास दानवे अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा व्हिडिओ
- ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
- निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल













