प्रतिनिधी, २८ नोव्हेंबर: संसदेत एप्रिल महिन्यात मंजूर न होऊ शकलेले डिलिमिटेशन विधेयक आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा आणले जात आहे. या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, आता संसदेत त्याची परीक्षा होणार आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे नव्या संघर्षाला सुरुवात होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला आहे. यावरून इंडिया आघाडीतच फूट पडली असून काँग्रेस नेते राहुल गांधी एकटे पडले आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आंबेडकर यांनी यावेळी दोन महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये २०० किलोमीटरपर्यंत अतिक्रमण केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर सेव्हन सिस्टर्सच्या भागात त्यांच्याकडून वीजनिर्मिती केली जाणार आहे. पुढे ही नदी भारतात येत असल्याने, चीनकडून भारताचे पाणी अडवले जाईल आणि पाण्यासाठी चीनला साथ देण्याची अट ठेवली जाईल, अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर म्हणाले.
त्याचबरोबर, जून-जुलै महिन्यात कोलंबो येथे झालेल्या एका परिषदेचा उल्लेखही त्यांनी केला. या परिषदेला पाकिस्तान, म्यानमारसह इतर देशांचे धोरणात्मक क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. यात पाकिस्तानचे अली खान यांच्यासह सर्वाधिक प्रतिनिधी होते. भारताचे जनरल मनोज मुकुंद नरवणे हेदेखील तेथे उपस्थित होते. मात्र, सरकारशी कोणताही संबंध नसलेले राम माधव तिथे कोणत्या अधिकारात गेले होते? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे.







